न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ग्रँट इलियट मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच
By admin | Published: March 24, 2015 07:55 PM2015-03-24T19:55:39+5:302015-03-24T19:56:52+5:30
तडाखेबाज खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे तिकीट कन्फर्म करणारा फलंदाज ग्रँट इलियट हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच.
Next
ऑकलंड, दि. २४ - तडाखेबाज खेळी करत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे तिकीट कन्फर्म करणारा फलंदाज ग्रँट इलियट हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचाच. जोहान्सबर्ग येथे जन्मलेल्या इलियटनेच आफ्रिकेचा पराभव करुन न्यूझीलंडला विजय मिळवून दिल्याचा अनोखा योगायोग सेमी फायनलमध्ये जुळून आला आहे.
वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने होते. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जाण्याचा पहिला मौका साधण्यासाठी दोन्ही संघ आसूसलेले होते. अपेक्षेप्रमाणे हा सामना कमालीचा चुरशीचा झाला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारुन फायनलमध्ये धडक दिली. न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो नाबाद ८४ धावांची खेळी करणारा ग्रँट इलियट. विशेष म्हणजे हा इलियट मुळचा दक्षिण आफ्रिकेचाच. ३६ वर्षीय इलियटचा जन्म २१ मार्च १९७९ मध्ये जोहान्सबर्ग येथे झाला. २००१ मध्ये ग्रँटने नव्या संधीच्या शोधात न्यूझीलंड गाठले. स्थानिक स्पर्धांमध्ये वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळणारा इलियट हा उत्कृष्ट फलंदाजासोबतच चांगला गोलंदाजही. २००८ मध्ये न्यूझीलंडच्या निवड समितीची इलियटवर नजर पडली व न्यूझीलंड संघात त्याला मोका मिळाला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेद्वारे इलियटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कसोटी पदार्पण अपयशी ठरल्याने इलियटला संघातून वगळले. यानंतर इलियट क्लब क्रिकेट खेळण्यासाठी रवाना झाला. जेकब ऑरमला दुखापत झाल्याने इलियटला न्यूझीलंडच्या एकदिवसीय संघात संधी देण्यात आली. पहिल्याच सामन्यात त्याने गोलंदाजीने छाप पाडून न्यूझीलंडच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. शांत संयमी स्वभाव, गॅप शोधण्याची कसब यासाठी इलियट ओळखला जातो. इलियट हा न्यूझीलंडचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज म्हणून नावारुपाला येत आहे.