धक्कादायक! २९ दिवसांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं; हॉस्पिटलबाहेर येताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:44 PM2022-10-29T12:44:08+5:302022-10-29T12:44:24+5:30
या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते.
कटनी - मध्य प्रदेशातील कटनी जिल्हा रुग्णालयातील SNCU मध्ये नर्सिंग स्टाफचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे. २९ दिवसांचे नवजात बालक मृत झाल्याचं सांगून नातेवाइकांना घरी जाण्यास सांगितले. मात्र हॉस्पिटलबाहेर येताच मुलाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचा संशय कुटुंबाला आल्याने त्यांनी तात्काळ ओपीडीमध्ये जाऊन डॉक्टरांना ही बाब सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता बालकाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं सांगण्यात आले.
या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. याबाबत दोषींवर कारवाई करण्याऐवजी सिव्हिल सर्जन त्यांना वाचवताना दिसत होते. मिळालेल्या माहितीनुसार, हरैया गावात राहणारा सोनूपती विष्णू चौधरी विजयराघवगड हिची जिल्हा रुग्णालयात प्रसूती झाली. तिला २९ दिवसांचे बाळ होते. बाळ बरे झाल्यावर महिलेला घरी सोडण्यात आले त्यानंतर आई आणि मूल दोघेही घरी गेले.
मात्र घरी आल्यानंतर मुलाची प्रकृती अचानक बिघडल्याने शुक्रवारी दुपारी त्याला पुन्हा एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले, तेथे उपचार सुरू होते. पण काही वेळाने नर्सिंग स्टाफने सांगितले की, आता तुमच्या मुलाचा श्वास थांबला आहे. त्याला घरी घेऊन जा, मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला, आई वडील रडू लागले, मृत मुलाला रुग्णालयातून बाहेर आणत घरी निघाले.
परंतु काही क्षणात मुलाचा श्वास सुरू असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी ओपीडीमध्ये बसलेल्या डॉक्टरांना ही बाब सांगितली. या डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा मुलाच्या हृदयाचे ठोके चालू होते. यानंतर कुटुंबियांनी तात्काळ मुलाला खासगी रुग्णालयात नेले, तेथे मुलावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाबाबत सिव्हिल सर्जन डॉ. यशवंत वर्मा म्हणाले, मुलाचा श्वास बंद झाल्यानं नर्सिंग स्टाफनं हे सांगितले असेल. मात्र कुटुंबियांनी न सांगता मुलाला रुग्णालयातून नेले आहे. हॉस्पिटलमधील प्रत्येक मूल निरोगी असावे यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो असं डॉक्टरांनी म्हटलं. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून घडलेल्या प्रकारामुळे मुलाच्या आई वडिलांसह नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"