Covid School News India: लहान मुलांना होतोय कोरोना, शाळा बंद कराव्यात का? तज्ज्ञ का नकार देत आहेत जाणून घ्या... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:32 PM2022-04-21T15:32:16+5:302022-04-21T15:32:54+5:30

देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जेव्हा शाळकरी मुलांना कोरोनाची लागण होऊ लागली तेव्हापासून पालकांचं टेन्शन वाढलं आहे.

News About Covid Cases India Kids Not Drivers Of Coronavirus Do Not Shut Schools Experts Opinion | Covid School News India: लहान मुलांना होतोय कोरोना, शाळा बंद कराव्यात का? तज्ज्ञ का नकार देत आहेत जाणून घ्या... 

Covid School News India: लहान मुलांना होतोय कोरोना, शाळा बंद कराव्यात का? तज्ज्ञ का नकार देत आहेत जाणून घ्या... 

Next

नवी दिल्ली-

देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जेव्हा शाळकरी मुलांना कोरोनाची लागण होऊ लागली तेव्हापासून पालकांचं टेन्शन वाढलं आहे. मे महिन्याच्या शेवटी उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत, त्यामुळे जवळपास महिनाभर शाळा बंद ठेवाव्यात, अशी काही पालकांची इच्छा आहे. जुलैपर्यंत कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. दुसरीकडे, दिल्लीत पुन्हा मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत, परंतु शाळा अद्याप बंद करण्यात आलेल्या नाहीत. नोएडा-गाझियाबादमध्येही शाळा सुरू आहेत. कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्यानंतर ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींमध्ये अभ्यास सुरू झाला आहे. अशा वेळी आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मुलांमध्ये कोविड-19 संसर्ग वाढल्यानं काळजी करण्याचं कारण नाही. SARS-CoV-2 ची लागण झालेल्या मुलांमध्ये फक्त किरकोळ लक्षणं दिसत आहेत. मुलांना मास्क घालण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असंही ते म्हणाले. 

लहान मुलांमधून महामारीचा प्रसार होणार नाही
ICMR चे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांच्या म्हणण्यानुसार, सध्या दिसून येणारी कोरोना रुग्णवाढ ही काही लहान मुलांमधून पसरत नाही. शाळांना आमचा सल्ला आहे की त्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं आणि प्रत्येकानं मास्क घालणं अनिवार्य करावं. कोणत्याही भागात शाळा सुरू झाल्या आणि त्यामुळे कोरोना पसरला असं दिसून आलेलं नाही. शाळा बंद केल्यानं विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होतो. अशावेळी देशातील कोविड महामारी पाहता असं पाऊल उचलणं योग्य नाही, असंही ते म्हणाले. 

एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शाळा बंद असताना भारतातील 70-90 टक्के मुलांना विषाणूचा संसर्ग झाला आहे असं सिरो सर्व्हेक्षणातून दिसून आलं आहे. ते म्हणाले की आम्हाला माहित आहे की मुले प्रौढांप्रमाणेच संवेदनाक्षम असतात, परंतु बहुतेक मुलांमध्ये कोविडची लक्षणे दिसत नाहीत किंवा ती सौम्य असतात.

राज्य बालरोग टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रमोद जोग म्हणाले की, मुलांना मास्क वापराचं महत्व पटवून द्यावं आणि त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या तुलनेत मुलांमधील संसर्ग गंभीर नाही, परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की दुसर्‍या लाटेदरम्यान महाराष्ट्रात ११ टक्के रुग्ण १० वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. काही मुलांमध्ये कोविडची लक्षणे बऱ्याच काळापासून दिसून येतात, त्यामुळे त्यास हलक्यात घेता येणार नाही. त्यावेळी मल्टीसिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमची प्रकरणं समोर आली होती.

12 ते 14 वयोगटातील लसीकरणाची व्याप्ती वाढवली पाहिजे कारण लसीकरण केल्याने रोगाची तीव्रता आणि मृत्यू टाळण्यास मदत होते, असंही डॉ. जोग म्हणाले.

दिल्लीची अवस्था
दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं त्याचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. रुग्णालयातील खाटा, वैद्यकीय ऑक्सिजन आणि औषधांची व्यवस्था करण्याकडं लक्ष दिलं जात आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं अधिकारी आणि सरकारचं म्हणणं आहे. रुग्णालयातील एकूण ९,७३७ खाटांपैकी फक्त ८० खाटा भरल्या आहेत, ज्याचं प्रमाण केवळ ०.८१ टक्के इतकं आहे. त्याच वेळी, ऑक्सिजन सुविधेसह ०.६४ टक्के बेड, आयसीयूमध्ये ०.९१ टक्के आणि व्हेंटिलेटर बेड १.०३ टक्के भरले आहेत.

यूपी सरकारही सतर्क
गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोना संसर्गाचे १०३ नवीन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १८ मुलांचा समावेश आहे. दुसरीकडे, यूपीमध्ये, मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर कोविड व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मुलांच्या आरोग्याच्या सुरक्षेबाबत आपण दक्ष राहायला हवे, यावर त्यांनी भर दिला. 

महाराष्ट्रात सध्या मास्कची गरज नाही
राज्यातील कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात असून घाबरून जाण्याची गरज नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेईल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मास्क घालणे बंधनकारक नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ज्येष्ठ नागरिक आणि वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे.

Web Title: News About Covid Cases India Kids Not Drivers Of Coronavirus Do Not Shut Schools Experts Opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.