न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:19 AM2021-05-01T06:19:08+5:302021-05-01T06:20:06+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि प्रसारमाध्यमांनी रोहित सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
नवी दिल्ली : दूरचित्रवाणी पत्रकार राेहित सरदाना (४२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी येथे निधन झाले. सरदाना यांची कोरोना विषाणूची चाचणी नुकतीच सकारात्मक आली होती. सरदाना हे ‘आज तक’ या वृत्त वाहिनीत न्यूज अँकर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि प्रसारमाध्यमांनी रोहित सरदाना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. मोदी ट्विटरवर म्हणाले की, ‘रोहित सरदाना हे आम्हाला खूप लवकर सोडून गेले. त्यांच्यात ऊर्जा होती. त्यांची अनेक लोकांना आठवण येईल. त्यांच्या अकाली निधनामुळे माध्यमांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.’ अमित शहा म्हणाले, ‘रोहित सरदाना यांच्या अकाली निधनामुळे दु:ख झाले. देशाने एक धाडसी पत्रकार गमावला.’
रोहित सरदाना ‘झी न्यूज’वर भारतातील समकालीन विषयांवर चर्चा करणारा असा ‘ताल ठोक के’ हा वादविवादाचा कार्यक्रम आयोजित करायचे. त्याला मोठी लोकप्रियता लाभली होती.सरदाना २०१७ मध्ये ‘झी न्यूज’ सोडून ‘आज तक’ मध्ये आले. तेव्हापासून ते ‘दंगल’ हा वादविवादाचा शो आयोजित करायचे.