वृत्तवाहिन्यांनीही गुगलकडे मागितला बातम्यांचा माेबदला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 05:45 AM2021-03-12T05:45:44+5:302021-03-12T05:46:13+5:30
‘एनबीए’चे गुगलला पत्र, भारतातही मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशातील वृत्तपत्रांनंतर आता वृत्तवाहिन्यांनीही गुगलकडे बातम्यांचा माेबदला मागितला आहे. जाहिरातींच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलातील याेग्य वाटा मिळावा, अशी मागणी गुगलकडे करण्यात आली आहे. वृत्तवाहिन्यांची संघटना ‘न्यूज ब्राॅडकास्टर्स असाेसिएशन’ (एनबीए)ने गुगलला याबाबत पत्र लिहिले आहे
संघटनेचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुगल इंडियाचे देश व्यवस्थापक संजय गुप्ता यांना पत्र लिहिले आहे. त्यात शर्मा यांनी सांगितले की, डिजिटल वृत्त व्यवसायावर जाहिरातींच्या महसुलाच्या अयाेग्य वितरणामुळे प्रचंड ताण आला आहे. या महसुलातील माेठा वाटा तंत्रज्ञान क्षेत्रातील गुगलसारख्या बड्या कंपन्या घेतात. त्यामुळे वृत्त वाहिन्यांचा महसूल माेठ्या प्रमाणात घटला आहे. त्यामुळे गुगलने बातम्यांसाठी याेग्य माेबदला द्यावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये विधेयक पारित करण्यात आले हाेते. त्यानुसार साेशल मीडिया कंपन्यांना स्थानिक बातम्या दाखविण्यासाठी पैसे माेजावे लागणार आहेत.
‘आयएनएस’ने केली हाेती मागणी
भारतीय वृत्तपत्र संघटनेचे (आयएनएस) अध्यक्ष एल. आदिमूलम यांनी काही दिवसांपूर्वी संजय गुप्ता यांना पत्र लिहून गुगलकडे बातम्यांचा याेग्य माेबदला देण्याची मागणी केली हाेती. ऑनलाइन बातम्यांद्वारे मिळणाऱ्या महसुलातील वाटा ८५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली हाेती. तसेच महसूल वितरणामध्ये अधिक पारदर्शकता आणावी, असेही गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले हाेते.