न्यूज क्लिकचे मुख्य संपादक आणि एचआर प्रमुखाला अटक; देशाविरोधात चीनचा पैसा घेतल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:00 PM2023-10-03T21:00:24+5:302023-10-03T21:00:40+5:30
दिल्ली पोलिसांची मोठी टीम आज सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी पोहोचली होती.
चीनमधून पैसा पुरविला गेल्याच्या आरोपांखाली न्यूज क्लिक या बातम्या देणाऱ्या वेबसाईटच्या कार्यालयासह पत्रकारांवर आज दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. यानंतर आता उशिरा न्यूजक्लिक मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांची मोठी टीम आज सकाळपासून जवळपास ३० ठिकाणांवर चौकशीसाठी पोहोचली होती. यावेळी पोलिसांनी न्यूज क्लिकच्या ८ ते ९ पत्रकारांची चौकशी केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आदी गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. काहींना पोलीस ठाण्यात चौकशी साठी नेण्यात आले होते. तर काहींच्या घरीच चौकशी करण्यात आली होती.
यामध्ये अभिसार शर्मा, प्रबीर पूरकायस्थ, भाषा सिंह, उर्मिलेश, सोहेल हाश्मी आदी पत्रकार होते. चीनकडून होणाऱ्या फंडिगबाबत आणि त्यातून काही देशविघातक कृत्य केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली होती. आता रात्री उशिरा न्यूजक्लिक मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर हेड अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी न्यूज क्लिकचे कार्यालयही बंद केले आहे.
5 ऑगस्ट 2023 रोजी न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित झाली होती. यामध्ये नेविली रॉय सिंघम हा अमेरिकन नागरिक चीनसाठी काम करत असल्याचा आणि देशातील संस्थांना पैसे पुरवत असल्याचा दावा करण्यात आला होता. भारतात न्यूजक्लिकला त्याने पैसे पुरविल्याचा आरोप होता. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस, चीन आणि काही पत्रकार हे त्रिकूट मिळून देशविरोधी कारवाया असल्याचा आरोप केला होता.