गुरुत्वाकर्षणाचे श्रेय न्यूटनचे नाही, भाजपा मंत्र्याचा दावा, म्हणे ब्रह्मगुप्त द्वितीयची होती कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:03 AM2018-01-10T06:03:30+5:302018-01-10T06:06:02+5:30
भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये देशाचा इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, त्यावरून सर्वत्र वाद होत असतानाच राजस्थानात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे.
जयपूर : भाजपा सत्तेवर असलेल्या राज्यांमध्ये देशाचा इतिहास बदलण्याचे जे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत, त्यावरून सर्वत्र वाद होत असतानाच राजस्थानात विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम बदलण्याची तयारी सुरू आहे. भाजपा नेते व राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी इतिहासापाठेपाठ विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रम बदलण्यास सांगतानाच, गुरूत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने नव्हे, त्याच्याआधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी मांडला होता , असा अजब दावाही केला आहे.
राजस्थान विद्यापीठाच्या स्थापना दिवसनिमित्त एका कार्यक्रमामध्ये राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी हे विधान केले. ते म्हणाले की, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त न्यूटनने मांडला असे आजपर्यंत तुम्ही शिकला आहात. तुम्हालाच काय, मलाही तेच शिकवण्यात आले. पण न्यूटनच्या हजारो वर्षे आधी ब्रह्मगुप्त द्वितीय यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता.
आपण आधुनिक आणि खºयाखुºया विज्ञानाचे धडेही द्यायला हवेत. उत्तम दर्जाच्या शालेय शिक्षणातूनच उच्च शिक्षणाचा भक्कम पाया रचला जाऊ शकतो, असे सांगताना शिक्षणमंत्री म्हणाले की, आपण ही जी माहिती दिली आहे, तीही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाद्वारे शिकवणे गरजेचे आहे. (वृत्तसंस्था)
पुस्तकांत आणखी बदल करू
उच्च शिक्षणातून केवळ चांगले पगाराची पॅकेज घेणारे विद्यार्थी घडत आहे. पण संस्काराचे मूल्य कमी होत आहे, असे सांगून देवनानी म्हणाले की, विद्यापीठांनी संशोधनाला प्राधान्य द्यायला हवे. यामुळे देशातील अनेक समस्यावर तोडगा निघू शकेल. त्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत आणि आणखी काही बदल करावे लागतील.