पुढील ३ वर्षांत देशामध्ये...; केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:28 AM2021-08-08T10:28:58+5:302021-08-08T10:31:49+5:30
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गृहमंत्री अमित शहांसमोर गडकरींचं मोठं विधान
अहमदाबाद: देशात अतिशय वेगात रस्तेनिर्मितीचं काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीला गती देण्यात येत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी म्हटलं. अमेरिकेत पाहायला मिळणाऱ्या दर्जाचे रस्ते भारतातही तयार होतील. पुढील ३ वर्षात असे रस्ते देशात पाहायला मिळू शकतात. देशवासीय तशी आशा करू शकतात, असं गडकरी म्हणाले. सध्याच्या घडीला देशात दररोज ३८ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत. याआधी दिवसाकाठी केवळ २ किलोमीटरचे रस्ते तयार व्हायचे, असंदेखील गडकरींनी सांगितलं.
बनासकांठा आणि दिसाला जोडणाऱ्या ३.७५ किमी लांबीच्या चौपदरी इलिवेटेड कॉरिडॉरचं काल लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते. रस्त्याचं उद्घाटन झाल्यानंतर गडकरींनी त्यांच्या विभागाकडून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. 'भारतमाला प्रकल्पाच्या अंतर्गत गुजरातमध्ये रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. काही प्रकल्पांमध्ये अधिग्रहणाचा अडथळा आहे. अशा समस्या मुख्यमंत्री रुपानी यांनी लवकर सोडवाव्यात,' असं आवाहन यावेळी गडकरींनी केलं.
'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वाखाली देशात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं विणलं जात आहे. रस्त्यांची कामं अतिशय वेगानं होत आहेत. पुढील तीन वर्षांत देशात अमेरिकन दर्जाचे महामार्ग पाहायला मिळतील. एक काळ असा होता, जेव्हा दिवसाकाठी केवळ दोन किलोमीटर रस्ते बांधले जायचे. आता आम्ही दिवसाकाठी ३८ किलोमीटरचे रस्ते तयाप करत आहोत,' असं म्हणत गडकरींनी आधीच्या काँग्रेस सरकारला टोला लगावला.