पुढील पाच-सात वर्षांत गंगा शुद्ध होणार -जावडेकर
By admin | Published: January 12, 2015 12:13 AM2015-01-12T00:13:55+5:302015-01-12T00:13:55+5:30
पुढच्या पाच ते सात वर्षांत गंगा पूर्णत: शुद्ध होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला
नवी दिल्ली : पुढच्या पाच ते सात वर्षांत गंगा पूर्णत: शुद्ध होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला आहे. उद्योग आणि कारखान्यांनी गंगा नदीत रसायन व घाण पाणी सोडण्याचे थांबविले नाही तर असे उद्योग बंद करण्याचे काम सुरूच राहील, असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.
गंगेचे शुद्धीकरण हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बनला आहे. आम्ही पुढच्या पाच-सात वर्षांत गंगा शुद्ध करू. ५० वर्षांपूर्वी युरोपमधील नद्यांची गंगा नदीसारखीच अवस्था होती; पण त्यांनी त्या नद्या स्वच्छ करण्याचे ठरविले आणि करूनही दाखविले. आम्हीही ते करून दाखवू, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरुद्ध सरकार कठोर पावले उचलत असल्याचे नमूद करून जावडेकर म्हणाले, ७६४ उद्योग गंगेला प्रदूषित करीत आहेत. आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)