इस्रोप्रमुख सिवन म्हणाले, पुढचे लक्ष्य गगनयान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:09 AM2019-09-22T02:09:46+5:302019-09-22T02:10:36+5:30
चांद्रयान-२ ला ९८ टक्के यश, लँडरशी संपर्क नाही
भुवनेश्वर : चांद्रयान-२ मिशनने ९८ टक्के यश मिळविल्याचे सांगतानाच गगनयान हे पुढचे ध्येय आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी भुवनेश्वर येथे दिली. तथापि, आम्ही लँडरशी आतापर्यंत कोणताही संपर्क साधू शकलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आयआयटीच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. के. सिवन यांनी सांगितले की, पुढील वर्षापर्यंत गगनयान मिशनचे लक्ष्य साध्य करण्याचे प्रयत्न आहेत. त्यांनी सांगितले की, चांद्रयान-२ ने ९८ टक्के यश मिळविले आहे. कारण, उद्देश दोन आहेत. एक विज्ञान आणि दुसरे तंत्रज्ञान प्रदर्शन. तंत्रज्ञान प्रदर्शनात यशाचे प्रमाण जवळपास पूर्ण आहे. भविष्यातील योजनांबाबत ते म्हणाले की, चर्चा सुरूआहे. अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. आमची प्राथमिकता पुढील वर्षीच्या मानवरहित मिशनची आहे. आम्हाला हे जाणून घ्यावे लागेल की, लँडरबाबत काय झाले? एक समिती विक्रमाबाबत विश्लेषण करीत आहे. के. सिवन म्हणाले की, आॅर्बिटर एक वर्षापर्यंत असे नियोजन होते; पण अशी शक्यता आहे की ते पुढील साडेसात वर्षांपर्यंत चालेल. आॅर्बिटरमध्ये आठ उपकरण आहेत आणि ते योग्य प्रकारे काम करीत आहेत.