रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! 'हा' नियम मोडल्यास जावे लागेल तुरुंगात, एनजीटीकडून आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 03:39 PM2022-02-03T15:39:32+5:302022-02-03T15:39:58+5:30
Indian Railways : बरेच लोक काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे.
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. या दरम्यान बरेच लोक काहीही विचार न करता चिप्स, इतर खाण्यापिण्याचे रॅपर किंवा इतर कोणतीही वस्तू रेल्वे स्टेशनवर टाकतात. तुम्हीही असेच करत असाल तर सावध व्हा. रेल्वे स्थानकावर घाण पसरवणाऱ्यांवर रेल्वे कारवाई करणार आहे. एवढेच नाही तर या सवयीमुळे तुमच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल (police case registered) होऊन तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.
एनजीटीकडून आदेश जारी
दरम्यान, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने आदेश (NGT orders) जारी केले आहेत. हे आदेश आयआरसीटीसीने (IRCTC) सर्व स्टेशन प्रभारींना पाठवले आहेत. त्यामुळे कोणताही विचार न करता स्थानकावर कचरा पसरवू नका. कचरा बॉक्समध्येच कोणतेही रॅपर टका. जेणेकरून स्थानकावर घाण पसरणार नाही. रेल्वेच्या आवारात अस्वच्छता पसरवण्यापासून प्रवासी परावृत्त होत नाहीत. काहीवेळा हे रॅपर जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांमध्येही अडकतात. त्यामुळे चाके जॅम होऊन अपघाताचा धोका वाढतो.
...तर होऊ शकतो तुरुंगवास
एनजीटीने नुकतेच रेल्वेला आपली स्थानके स्वच्छ ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर रेल्वेने नियम बदलून प्लॅटफॉर्मवर घाण पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत केवळ दंड वसूल करून संबंधित व्यक्तीला सोडले जात होते. रेल्वे ट्रॅक धूळमुक्त करण्यासाठी स्वतंत्र फ्लाइंग स्कॉड तयार करण्यात आले आहे. जे वेळोवेळी सप्राईज चेकिंग करेल. यासोबतच झोनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर रेल्वेच्या आदेशानंतर अनेक स्थानकांवरही ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
या कारखान्यांवरही होऊ शकते कारवाई
याशिवाय, रेल्वे अशा कारखान्यांवरही गुन्हा दाखल करणार आहे, जे रेल्वे रुळाच्या बाजूला आहेत आणि रेल्वे मालमत्तेवर घाण पसरवत आहेत. अशा लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यांची छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीही केली जाणार आहे. जेणेकरून तो पुरावा म्हणून सादर करता येईल. तसेच, रुळाच्या आजूबाजूला असलेल्या झोपडपट्ट्यांसमोर घाण आढळून आल्यास त्यांच्याकडूनही रेल्वे दंड वसूल करेल.