NHAI च्या ठेकेदाराचा विश्वविक्रम; २४ तासांत बनवला सर्वात लांबीचा सिमेंट काँक्रिटचा रस्ता
By प्रविण मरगळे | Published: February 4, 2021 01:12 PM2021-02-04T13:12:25+5:302021-02-04T13:14:18+5:30
या कामात १८.७५ मीटर रुंद आणि ४८ हजार ७११ मीटर परिसरात काँक्रिटचा रस्ता बनवण्यासाठी २४ तासाचा अवधी लागला.
एरव्ही आपण पाहिलेलं असेल एखाद्या रस्त्याचं काम सुरु झालं की ते कधी संपेल याची शाश्वती नसते, अनेकदा दिलेल्या कालावधीत काम पूर्ण झालंय हे क्वचितच ऐकायला मिळतं, परंतु एनएचएआय(NHAI) च्या एका ठेकेदाराने जो पराक्रम केला आहे त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. चारपदरी महामार्गाचं २४ तासांत २ हजार ५८० मीटर लांब सिमेंट क्रॉंक्रिटचा रस्ता तयार करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
सरकारकडून बुधवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत एनएचएआयचे ठेकेदार पटेल इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांना दिल्ली-वडोदरा-मुंबई या ८ पदरी एक्सप्रेस हायवेचा प्रकल्पात एक भाग २ हजार ५८० मीटर(१०.३२ किमी) रस्ता बनवण्याची सुरुवात केली होती, १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता या रस्त्याचं काम सुरू करण्यात आले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता हे टार्गेट पूर्ण झालं.
या कामात १८.७५ मीटर रुंद आणि ४८ हजार ७११ मीटर परिसरात काँक्रिटचा रस्ता बनवण्यासाठी २४ तासाचा अवधी लागला, या २४ तासांच्या काळात १४,६१३ घन मीटर काँक्रिटच्या प्रयोगाचा विक्रम नोंदवण्यात आला. या अनोख्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रिकोर्डस आणि गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली, हे संपूर्ण काम ऑटोमेटिक काँक्रिट मशीनच्या सहाय्याने करण्यात आले, चालू आर्थिक वर्षात २०२०-२१ मध्ये सरकारने एप्रिल २०२० ते १५ जानेवारी २०२१ मध्ये २८.१६ किमी प्रतिदिवस वेगाने ८ हजार १९६ किमी लांबीचा राष्ट्रीय महामार्गाचं निर्माण केलं आहे.
या काळात मागील वर्षी २६.११ किमी प्रतिदिवस वेगाने ७ हजार ५७३ किमी राष्ट्रीय महामार्गाचं निर्माण केले आहे, त्यामुळे रस्ते महामार्ग मंत्रालयाला अशी अपेक्षा आहे की, या गतीनेच रस्त्यांच्या निर्माणाचं काम झालं तर ३१ मार्च २०२१ पर्यंत ११ हजार किलोमीटर रस्ते निर्माणाचं लक्ष्य पूर्ण करण्यात यश मिळेल.