राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता आणखी सुकर, टोलवरील लाइव्ह ट्राफिक आधीच कळणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:30 PM2022-05-07T12:30:00+5:302022-05-07T12:30:53+5:30
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने आपल्या संकेतस्थळावर वेब लिंकची होस्टींग करत आता २१४ टोल नाक्यांवरील लाइव्ह ट्राफिकची माहिती सार्वजनिक केली आहे.
नवी दिल्ली-
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने आपल्या संकेतस्थळावर वेब लिंकची होस्टींग करत आता २१४ टोल नाक्यांवरील लाइव्ह ट्राफिकची माहिती सार्वजनिक केली आहे. ज्यामुळे टोल नाक्यावरील वाहतुकीचे व्यवस्थापन आता अधिक सोयीचे होणार आहे. तसेच वाहन चालकांना टोल नाक्यावरील ट्राफिकची माहिती आधीच मिळवता येणार आहे. इतकंच नव्हे, तर पुढील काही दिवसांत ४०७ टोल प्लाझा आणि त्यानंतर सर्व 700 टोल प्लाझावरील लाइव्ह ट्राफिकची माहिती देणारी सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
"वाहन चालकांना टोल नाक्यांवर गर्दीचा आणि ट्राफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. यात बराच वेळ देखील वाया जातो. त्यामुळे प्रवाशांचा याचा नक्कीच फायदा होणार आहे. तसेच आमचे अधिकारी आणि टोल ऑपरेटर देखील टोल नाक्यावरील रिअर टाईम ट्राफिक पाहून त्यानुसार व्यवस्थापन तसेच पुढील कार्यवाही करू शकतील. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यास त्वरित अॅक्शन मोडमध्ये तोडगा काढण्यासाठी टोल ऑपरेटर सज्ज होतील", असं NHI च्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
NHAI ने त्यांच्या 'सिटिझन चार्टर' पर्यायामध्ये वेबलिंक होस्ट केली आहे आणि त्यामुळे प्रवासी वेळेवर कारवाई करण्यासाठी टोल प्लाझावर येणाऱ्या अडचणींशी संबंधित समस्या मांडू शकतात. "प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यासाठी आम्ही एक सिस्टम तयार करू," असे अधिकारी म्हणाले. बॅकएंडमध्ये चोवीस तास मॉनिटरिंग केलं जाणार आहे.
महामार्ग मंत्रालयाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक डोमेनमध्ये रिअल-टाइम फीड टाकून NHAI ने आता प्रवाशांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि कोणत्याही समस्येवर इतरांना दोष देण्याची गरज नाही याची खात्री करण्याची अधिक जबाबदारी घेतली आहे.
“रिअल टाईम टोल प्लाझावर गर्दीच्या दृश्यासह लाइव्ह माहिती मिळण्याचा पर्याय हे एक उत्तम पाऊल आहे. पण फक्त लाइव्ह फीड देऊन चालणार नाही. 'डेटा आणि अॅनालिटिक्स' आधारित परिणाम साध्य करण्याची गरज आहे. हे महामार्ग प्राधिकरणाला कारवाई करण्यास आणि टोल वसुली एजंटांना उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मदत करेल", असे बुले टेक्नोलॉजीचे सह-संस्थापक अभिषेक रंजन म्हणाले.