दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख, तर छोटा शकीलसाठी २० लाखांचं बक्षिस; NIA कडून घोषणा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:14 AM2022-09-01T10:14:37+5:302022-09-01T10:15:00+5:30

राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.

nia announces 25 lakh reward on dawood ibrahim 20 lakh to chhota shakeel | दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख, तर छोटा शकीलसाठी २० लाखांचं बक्षिस; NIA कडून घोषणा! 

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख, तर छोटा शकीलसाठी २० लाखांचं बक्षिस; NIA कडून घोषणा! 

googlenewsNext

नवी दिल्ली-

राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाखांचं रोख बक्षीस देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाऊदसोबतच त्याचा राईट हँड समजला जाणारा कुख्यात गुंड छोटा शकील याच्यावर २० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. 

भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दाऊदनं सध्या एक युनिट स्थापन केली असल्याची माहिती गुप्तचर खात्याला मिळाली आहे. येत्या काळात भारतात दहशतवादी हल्ला किंवा देशातील बड्या राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्लान या युनिटकडून राबवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एनआयए सतर्क झाली असून भारतासाठी वॉन्टेड असलेल्या गुन्हेगारांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.  

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्याला २५ लाख रुपये रोख, तर छोटा शकीलची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपये देण्यात येतील. तसंच हाजी अनिस, जावेद चिकना आणि टायगर मेनन यांच्यावर प्रत्येकी १५ लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.  

पाकिस्तानातील कराची येथे राहणारा आणि १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी वाँटेड असलेला इब्राहिम याच्यावर २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं २५ लाख डॉलरचं बक्षीस याआधीच जाहीर केलं आहे. दाऊद भारतातील मोस्ट वॉन्टेड पुरुषांपैकी एक आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (जेएम) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा साथीदार अब्दुल रौफ असगर हे देखील मोस्ट वॉन्टेड आहेत. 

'डी' कंपनीने प्रमुख राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी दहशतवादी गट आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था - ISI - यांच्या मदतीने भारतात एक विशेष युनिट स्थापन केल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआयएने यावर्षी फेब्रुवारीमध्ये इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध नवीन गुन्हा नोंदवला. व्यापारी, तसेच भारतातील शहरांमध्ये हल्ला करण्यासाठी एलईटी, जेएम आणि अल-कायदा (एक्यू) च्या दहशतवादी आणि स्लीपर सेलला पाठिंबा देण्यासाठी दाऊदचे युनिटा काम करत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे.

तपासाचा एक भाग म्हणून, NIA ने या वर्षी मे महिन्यात २९ ठिकाणी छापे टाकले होते, ज्यात हाजी अली दर्गा आणि माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांचाही समावेश होता. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी समीर हिंगोरा; छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट; गुड्डू पठाण, इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरचे नातेवाईक आणि कय्युम शेख, भिवंडीचा रहिवासी यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या होत्या. 

 

Web Title: nia announces 25 lakh reward on dawood ibrahim 20 lakh to chhota shakeel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.