टेरर फंडिंग - हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक, एनआयएची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 01:12 PM2017-10-24T13:12:15+5:302017-10-24T18:02:39+5:30
टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती मोठं यश लागलं असून हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.
श्रीनगर - टेरर फंडिंग प्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) हाती मोठं यश लागलं असून हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा शाहिद युसूफ जम्मू काश्मीरचा सरकारी कर्मचारी आहे. शाहिद युसूफ जम्मू काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ज्युनिअर इंडिनिअर आहे. 2011 टेरर फंडिंग प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. एनआयएची ही मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे.
शाहिद युसूफ सौदी-अरेबियामधील हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटिव्ह एजाज अहमद भटच्या संपर्कात होता हे तपासात निष्पन्न झालं आहे. एजाज अहमददेखील एनआयएच्या रडारवर आहे. शाहिद युसूफला काश्मीर खो-यात अलगावादी आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी पैसे पुरवण्यात आले होते.
Syed Salahuddin's son Syed Shahid Yusuf questioned by NIA in Delhi over 2011 terror funding case, has been arrested.
— ANI (@ANI) October 24, 2017
गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांना नातेवाईक आणि हवालाच्या माध्यामातून मिळणा-या पैशांविरोधात सक्त कारवाई करत आहे. सय्यद सलाहुद्दीनने दोन लग्नं केली आहेत, आणि शाहिद युसूफ हा त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन आपल्या दुस-या पत्नीसोबत पाकिस्तानात राहतो. याचवर्षी संयुक्त राष्ट्राने सय्यद सलाहुद्दीनने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे.
सय्यद सलाहुद्दीन पाकिस्तानमधील युनायटेड जिहाद काऊन्सिलचा प्रमुख आहे. भारतामधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्याचा हात होता. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मददेखील सलाहुद्दीनच्या संघटनेचा एक भाग आहे.