एनआयएकडून इसिसचे दोघे अटकेत
By admin | Published: July 13, 2016 02:44 AM2016-07-13T02:44:31+5:302016-07-13T02:44:31+5:30
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी इसिसच्या कथित हैदराबाद मॉड्युलच्या प्रमुखाला त्याच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे
हैदराबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी इसिसच्या कथित हैदराबाद मॉड्युलच्या प्रमुखाला त्याच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. एनआयएने २९ जून रोजी या मॉड्युलचा भंडाफोड केला होता.
तेलंगणातील गुप्तचर विभागाने ही माहिती दिली. इसिसच्या हैदराबाद मॉड्युलचा प्रमुख यासिर नियामतुल्ला आणि त्याचा सहकारी अताउल्ला रहमान यांना एनआयएने अटक केली आहे. रहमान हा या मॉड्युलसाठी पैसा एकत्रित करीत होता, असे सांगितले जात आहे. अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून २९ जून रोजी एनआयएने शहरातून पाच जणांना अटक केली होती. या पूर्वी अटक करण्यात आलेल्यांत मोहम्मद इब्राहिम, हबीब मोहम्मद, मोहम्मद इलयास यजदानी, अब्दुल्ला बिन अहमद अल अमुदी आणि मुजफ्फर हुसैन रिजवान यांचा समावेश आहे.
एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या पाचही आरोपींनी अतिरेकी
हल्ले करण्यासाठी हत्यारे आणि स्फोटक साहित्य जमा केले होते. हे सर्व इसिसच्या संपर्कात होते.
दरम्यान, तपास संस्थेला असा संशय आहे की, इराक अथवा सीरियातून एक म्होरक्या येथील तरुणांना सूचना देत आहे. (वृत्तसंस्था)