NIA-ED Raid on PFI: केंद्रातील मोदी सरकार लवकरच PFIवर बंदी घालणार; NIA च्या हाती मोठे पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 02:20 PM2022-09-25T14:20:26+5:302022-09-25T14:21:36+5:30
Ban PFI: पीएफआयविरोधात NIA आणि ED च्या कारवाईत तपास संस्थांना हवाला ते दहशतवादाचे पुरावे मिळाले आहेत.
NIA-ED Raid on PFI: 22 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान पीएफआयशी संबंधित 106 लोकांनाही अटक करण्यात आली. या छाप्यात अनेक खुलासे झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांनी गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालय पीएफआयवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
PFI विरुद्ध भक्कम पुरावे सापडले
पीएफआयवर पीएफआयवर बंदी घातली आणि संस्थेने या बंदीला कोर्टात आव्हान दिले, तर कोर्टात सादर करण्यासाठी मजबुत पुरावे लागणार आहेत. त्यामुळेच पीएफआयवर बंदी घालण्यापूर्वी गृहमंत्रालयाच्या अधिकारी पूर्ण तयारी करत आहेत. दरम्यान, गुरुवारी देशातील 15 राज्यांमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये तपास यंत्रणांना पीएफआयविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचे भक्कम पुरावे मिळाले आहेत. त्याआधारे लवकरच पीएफआयवर कारवाई होऊ शकते.
कारवाईच्या सूचना दिल्या
छापेमारीनंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि एनआयए प्रमुख यांचीही बैठक घेतली. यामध्ये पीएफआयच्या विरोधात जमा झालेल्या पुराव्यांचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालय पीएफआयवर बंदी घालण्याआधी कायदेशीर सल्लाही घेत आहे, जेणेकरून या प्रकरणी संबंधित पक्ष जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा सरकारची तयारी पूर्ण होईल.
NIA आणि EDचे छापे
वेगवेगळ्या एजन्सी अनेक वर्षांपासून पीएफआयविरोधात सबळ पुरावे गोळा करण्यात गुंतल्या होत्या. पीएफआय संस्थेची कोणतीही लिंक सोडू नये, अशा सूचना गृह मंत्रालयाकडून देण्यात आल्या होत्या. एनआयएचा तपास गुन्हेगारी संघटनेच्या बेकायदेशीर कृतींवर केंद्रित असताना, ईडीला आता त्यांच्या आर्थिक स्रोताचा शोध घेण्यात पूर्णपणे यश आले आहे.
60 कोटींचा गैरव्यवहार
ईडीशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, तपासादरम्यान पीएफआयच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 60 कोटींचे संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत. हवालाद्वारेही पीएफआयला पैसे पाठवले जात असल्याचे माहिती मिळाली आहे. यासाठी आखाती देशांमध्ये काम करणाऱ्या मजुरांच्या बँक खात्यांचा वापर करून भारतात पैसे पाठवले जात होते. दुसरीकडे, एनआयएने 5 वेगवेगळ्या नोंदणीकृत प्रकरणांमध्ये भक्कम पुरावे गोळा केले आहेत, ज्यात स्फोटक बनवण्यापासून ते ISIS सारख्या संघटनेत तरुणांना पाठवण्यापर्यंतचे आरोप आहेत.