दहशतवादी हल्ल्याचा होता कट, इसिस प्रकरणात ७ आरोपींविरोधात एनआयएचे आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 06:32 AM2023-11-06T06:32:58+5:302023-11-06T06:35:50+5:30
आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता.
मुंबई : देशातील विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याच्या कटात सहभागी असलेल्या इसिसच्या ७ सदस्यांविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आरोपपत्र दाखल केले. पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात यूएपीए कायद्यासह विविध कलमांतर्गत मुंबईच्या एनआयए न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
आरोपींवर इसिसच्या टेरर मॉड्यूलच्या दहशतवादी आणि हिंसक कारवायांना घडवण्यासह निधी गोळा करण्याचाही आरोप हाेता. त्यांनी दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे, त्यांना आश्रय देणे, तसेच आईडीची निर्मिती करण्याचाही आरोप ठेवण्यात आला. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तपासासाठी ६९ दिवसांची मुदतवाढ देण्याची एनआयएची विनंती न्यायालयाने फेटाळली.
अनेक राज्यांत केली होती रेकी
दहशतवादी हल्ले करण्यासाठी आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणासह अनेक राज्यांमध्ये रेकी केली होती. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविण्यासह नेमके कुठे स्फोट घडवता येतील, याची चाचपणी रेकीदरम्यान त्यांनी केली.
स्फोट झाल्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी त्यांच्याकडे सविस्तर योजना आखलेली होती. त्यानुसार त्यांनी दुर्गम भागातील घनदाट जंगलांतील संभाव्य ठिकाणेही निश्चित केली होती. त्यासाठी ड्रोनचाही वापर केला होता.
मोठे नेटवर्क उद्ध्वस्त
अटक केलेल्या आरोपींनी भारताची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचविण्याच्या हेतूने इसिसच्या दहशतवादी कारवाया वाढविण्याचा कट आखला होता. त्यांच्या अटकेमुळे इसिसचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपपत्रात कुणाची आहेत नावे?
मोहम्मद इमरान मोहम्मद युसूफ खान (रा. रतलाम, मध्य प्रदेश)
मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (रा. रतलाम, मध्य प्रदेश)
कदीर दस्तगीर पठाण (रा. कोंढवा, पुणे)
सीमाब नसीरुद्दीन काझी (रा. कोंढवा, पुणे)
जुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे)
शमील साकीब नाचन (रा. पडघा, ठाणे)
आकीफ अतीक नाचन (रा. पडघा, ठाणे)