एनआयएने पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो केले जारी
By admin | Published: March 22, 2016 09:26 AM2016-03-22T09:26:57+5:302016-03-22T09:30:50+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जारी केले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २२ - पठाणकोट दहशतवादी हल्यातील चार दहशतवाद्यांचे फोटो राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) जारी केले आहेत. 2 जानेवारीला पठाणकोटमधील एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने लोकांना या दहशवाद्यांबद्दल कोणतीही माहिती असेल तर ती देण्याचं आवाहनही केलं आहे.
तर दुसरीकडे पाकिस्तानचं तपास पथक 27 मार्चला भारतात येत असून त्यांना पठाणकोट एअरबेसमध्ये जाऊन पाहणी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचं तपास पथक नवी दिल्ली आणि पठाणकोट या दोन ठिकाणी भेट देऊन आपला तपास करणार आहे. दिल्लीत एनआयएशी सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी तपासात केलेल्या प्रगतीबद्दल माहिती देण्यात येईल तर दुसरीकडे पठाणकोटमध्ये जिथे हल्ला झाला त्या एअरबेसमध्ये त्यांना नेण्यात येईल.
एनआयए प्रमुख शरद कुमार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. पाकिस्तान तपास पथकाला पठाणकोटला जाऊ द्यायचं की नाही हा निर्णय सरकार योग्य वेळी घेईल असं त्यांनी सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान तपास पथकासोबत एनआयएचे अधिकारीदेखील पठाणकोटमध्ये जाणार आहेत.
एनआयए यावेळी पाकिस्तान पथकाला प्रथामिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीबद्दल विचारणा करु शकते. तसंच पाकिस्तानात दाखल करण्यात आलेला एफआयआर, अटक यावरदेखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पाकिस्तान पथकदेखील एनआयएला तपासातील प्रगती, पुरावे आणि नेमके किती दहशतवादी होते यावरुन सुरु असलेल्या गोंधळावर प्रश्न विचारु शकते.