एनआयएकडून लवकरच होणार चौकशी
By admin | Published: July 18, 2014 01:35 AM2014-07-18T01:35:53+5:302014-07-18T01:35:53+5:30
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याची भेट घेणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांचा लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जाबजबाब घेतला
नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याची भेट घेणारे पत्रकार वेदप्रताप वैदिक यांचा लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जाबजबाब घेतला जाण्याची शक्यता आहे. हाफिज हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सूत्रधार असून यानिमित्ताने वैदिक यांना प्रश्न विचारले जाऊ शकतात. रा.स्व.संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी रामदेव बाबा यांचे निकटस्थ असलेल्या वैदिक यांना समर्थन जाहीर केले असतानाच चौकशीचा पाश आवळला जाण्याचे संकेत मिळाले आहेत.
इंद्रेशकुमार हे भाजपाच्या मुस्लिमांसंबंधी कार्यक्रमाचे प्रमुख आहेत. त्यांनी बुधवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, मी वैदिक यांच्यासंबंधी बातम्या वाचल्या आहेत.
एका पत्रकाराला त्याच्या इच्छेनुसार कुणालाही भेटण्याचे स्वातंत्र्य असते. वैदिक यांचे मूळ संस्कृतीत रुजले असून ते पक्के राष्ट्रवादी आहेत. त्यांनी केले ते राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवूनच केले असावे. सरकारने वैदिक -हाफिज भेटीची निंदा केली असतानाच इंद्रकुमार चर्चेत आले आहेत.
वैदिक हे रा.स्व.संघाच्या कार्यात सहभागी असल्याचा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला आरोप इंद्रकुमार यांनी फेटाळून लावला. वैदिक यांनीही स्वत: रा.स्व.संघात सहभागी असल्याचा इन्कार केला आहे.
वैदिक हे गुरू रामदेव यांचे खास निकटस्थ मानले जात असून भाजपाच्या नेतृत्वातील सरकारनेच वैदिक-हाफिज भेट घडवून आणल्याचा विरोधकांनी केलेला आरोप विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळला आहे.
हाफिज याची भेट कशी घेतली, त्याच्याकडून कोणती माहिती घेतली हे जाणून घेण्यासाठी वैदिक यांना एनआयए प्रश्न विचारू शकते. सईद याच्याशी झालेल्या भेटीतून काही प्रतिकूल निष्पत्ती निघाल्यास वैदिक यांना आरोपी मानले जाऊ शकते. मुख्यत: मुंबई हल्ल्यासंबंधी प्रश्न विचारले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)