एनआयए हेडलीच्या पत्नीची चौकशी करणार?
By admin | Published: November 30, 2015 01:02 AM2015-11-30T01:02:45+5:302015-11-30T01:02:45+5:30
डेव्हिड हेडलीच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत असलेल्या संबंधांची माहिती प्राप्त करता यावी यासाठी त्याची पत्नी फैजा ओताल्हा हिचा जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी
नवी दिल्ली : डेव्हिड हेडलीच्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसोबत असलेल्या संबंधांची माहिती प्राप्त करता यावी यासाठी त्याची पत्नी फैजा ओताल्हा हिचा जबाब नोंदविण्याची परवानगी देण्यात यावी, अशी नवी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मोरोक्को सरकारला केली आहे. फैजा ही हेडलीपासून विभक्त झाली आहे. तिचे जबाब नोंदविल्याने २६/११ च्या मुंबई हल्ल्यात पाकिस्तान सरकारमधील अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचा पर्दाफाश होऊ शकतो, असा एनआयएला विश्वास आहे.
याआधी एनआयएने २०१२ मध्ये पाठविलेल्या अशाच एका विनंती पत्रावरून मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी फैजाचा जबाब पाठविला होता. फैजाचा हा जबाब मोरोक्कोच्या तपास संस्थेने नोंदविला होता. या जबाबात एनआयएच्या अनेक चिंतांचा समावेश करण्यात आला आहे.
एनआयएने २००९ मध्ये भारतात हेडलीच्या कारवायांच्या तपासासाठी गुन्हा दाखल केला होता. फैजा ओताल्हा हिची व्यक्तिगतरीत्या चौकशी करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे पत्र एनआयएने मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांना पाठविले आहे. पाकिस्तानी लष्कराचे दोन मेजर आणि दहशतवादी हाफीज सईद आणि जकीऊर रहमान याची मुंबई हल्ल्यातील भूमिका निश्चित करणे हा यामागचा हेतू आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
ही ताजी विनंती फ्रान्समध्ये केलेल्या भाषांतरासह पाठविण्यात आली आहे. कारण मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी दस्तऐवजांच्या भाषांतराकडे लक्ष वेधत जुने विनंतीपत्र परत पाठविले होते. विनंती पत्राचा मजकूर भाषांतरित करून पाठविणे हा त्या देशाचा नियम आहे. (वृत्तसंस्था)