तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 20:39 IST2025-04-11T20:38:27+5:302025-04-11T20:39:00+5:30

Tahawwur Rana NIA Investigation: गुरुवारी भारतात आणल्यानंतर लगेचच शुक्रवारी NIA ने राणाची तीन तास चौकशी केली. परंतु, राणाने तपासात सहकार्य केले नसल्याचे सांगितले जात आहे.

nia questioned tahawwur rana for 3 hours but he did not cooperate what questions were asked | तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?

तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?

Tahawwur Rana NIA Investigation: मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून गुरुवारी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. गेल्या १५ वर्षांपासून भारताकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश आले. राणाला घेऊन आलेले अमेरिकेचे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरले. तिथून त्याला थेट एनआयएच्या कार्यालयात नेऊन नंतर पतियाळा हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. मध्यरात्री न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची कोठडी सुनावली. यानंतर आता एनआयएने चौकशीला सुरुवात केली आहे. 

तहव्वूर राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत एनआयएच्या विशेष न्यायालयात नेण्यात आले. एनआयएचे वकील दयान कृष्णन यांनी न्यायालयाला सांगितले की, विद्यमान पुरावे आणि इतर तथ्यांची पुष्टी करण्यासाठी राणा यांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. या प्रकरणाशी संबंधित तथ्ये न्यायालयात सादर केली. न्यायाधीशांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली गेली. तर, तर तहव्वूर राणाच्या वतीने वकील पीयूष सचदेवा यांनी बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने मध्यरात्री आपला निकाल दिला. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर तहव्वूर राणाची एनआयएने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी दिवसभरात ३ तास चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

३ तास NIA चौकशी, पण राणाने सहकार्य केले नाही

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्याला कोण निधी देत होते? स्लीपर सेल्स कोण आहेत? त्याचे व्यवसाय भागीदार कोण आहेत? तो भारतात कोणाला निधी देत होता? भारतात हेडलीला कोणी मदत केली आणि पैसे कोणाला दिले गेले? साजिद मीर क्रिकेट पाहण्यासाठी भारतात का आला होता? ज्या ठिकाणांचे व्हिडिओ त्याने पाकिस्तानी सैन्याला दिले होते त्या ठिकाणी राणासोबत आणखी कोणी गेले होते का? अशा प्रकारचे प्रश्न राणाला विचारले जाऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर एनआयएने शुक्रवारी राणाची केवळ ३ तासच चौकशी केली. राणाला विचारण्यात आलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे, "मला माहित नाही" किंवा "मला आठवत नाही" अशी उत्तरे देऊन एनआयए अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना टाळले एनआयए अधिकाऱ्यांना राणाची उत्तरे समाधानकारक वाटली नाहीत. चौकशी करताना राणाला त्याच्या कुटुंब आणि मित्रांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. आजाराचे कारण देऊन त्याने वारंवार चौकशी टाळण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण झाल्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अद्यापही झडताना पाहायला मिळत आहेत. तसेच काँग्रेस आणि भाजपामध्ये श्रेयवादावरून लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. दाऊदसह अन्य आरोपी तसेच भारतातून जे लोक फरार झाले आहेत, त्यांना परत आणल्यास खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचे स्वागत करू, असे विरोधकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्या मुसद्देगिरीमुळेच अमेरिकेने राणाला भारताकडे सोपवले. हा भारताचा मोठा विजय आहे, असे एनडीएतील पक्षांचे म्हणणे आहे.

 

Web Title: nia questioned tahawwur rana for 3 hours but he did not cooperate what questions were asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.