NIA Raid: मोठ्या नेत्याची हत्या आणि श्री राम मंदिर उडवण्याचा कट; NIAच्या हाती लागला VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 03:40 PM2023-02-05T15:40:16+5:302023-02-05T15:40:24+5:30
NIA Raid: छापेमारीदरम्यान पीएफआयच्या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पूर्व चंपारण:बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. NIA टीमला छापेमारीवेळी संशयितांचा कट आखतानाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये एका मोठ्या नेत्याची हत्या आणि अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा कट उघड झाला आहे. NIA टीमने दुसऱ्या दिवशीही मुझफ्फरपूरमध्ये चकिया मेहसी केसरिया आणि मधुनबशिवाय अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
छापेमारीदरम्यान पीएफआयच्या आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने शनिवारी रात्री उशिरा मधुबन पोलीस स्टेशन हद्दीतील जितोरा येथे छापा टाकला, तेथून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची सध्या कसून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, एनआयएने मुझफ्फरपूरच्या शेजारच्या जिल्ह्यातील साहेबगंजमध्येही छापा टाकला, तेथून आणखी एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. एनआयए आणि आयबीची टीम शुक्रवारी रात्री उशिरा मोतिहारी येथे पोहोचली होती. दरम्यान, मोतिहारी पोलिसांच्या मदतीने त्यांनी पहिल्याच दिवशी चकिया आणि मेहसी येथे छापा टाकला, तेथून त्यांनी एका तरुणाला ताब्यात घेतले.
परदेशातून निधी आला
एनआयए टीमला एक व्हिडिओही मिळाला आहे, ज्यामध्ये प्रशिक्षण, एका मोठ्या नेत्याची हत्या आणि राम मंदिर उडवण्याच्या कटाची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या लोकांना परदेशातून फंडिंग करण्यात आले होते. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून दुसरा छापा टाकण्यास सुरुवात करण्यात आली. यानंतर एनआयएच्या पथकाने दानिशला चकिया पोलीस ठाण्यातील कुआबा येथील त्याच्या घरी नेले, तेथे त्याच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेण्यात आली.
संशयित नातेवाईकाच्या घरी राहत होता
अटक करण्यात आलेला तरुण गेल्या तीन महिन्यांपासून त्याच्या नातेवाईकाच्या घरी राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो दिल्लीहून आला होता आणि त्याच्या नातेवाईकाच्या घरी थांबला होता. त्याच रात्री एनआयएचे पथक मुझफ्फरपूरच्या साहेबगंजला रवाना झाले, तिथे साहेबगंजमधून एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले.