NIA Raid on PFI: रेडपूर्वी तयार करण्यात आली होती PFI ची 'क्राइम कुंडली', संपूर्ण रात्र कंट्रोल रूममध्येच होते अजित डोवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 01:06 PM2022-09-24T13:06:40+5:302022-09-24T13:09:10+5:30
पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता.
पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर (PFI) नुकत्याच टाकण्यात आलेल्या रेडपूर्वी आयबी आणि रॉने पीएफआयच्या कारवायांसंदर्भातील महत्वाची माहिती एकत्र केली होती. यात पीएफआयचे कॅडर आणि त्यांच्या नेत्यांशीसंबंधित माहितीचा एक संच (Dossier) तयार करण्यात आला होता. रेड टाकण्यापूर्वी हा Dossier नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि प्रवर्तन निदेशालयाला (ED) पुरवण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, मध्यरात्री झालेल्या या ऑपरेशनपूर्वी दिल्लीमध्ये एक स्पेशल कंट्रोल रूम तयार करण्यात आली होती. या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतः राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल आणि आयबीचे प्रमुख तपन डेका हे रात्रभर याच कंट्रोल रूममध्ये होते, असे समजते.
मिटिंगमध्ये करण्यात आला होता संपूर्ण प्लॅन -
यासंदर्भात झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एनआयए, ईडी आणि काही राज्यांतील पोलिसांच्या मदतीने पीएफआयच्या 93 लोकेशन्सवर छापे टाकण्यात आले होते. यात पीएफआयच्या एकूण 106 जणांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात गृह मंत्री अमित शाह यांनी पीएफआयवर कारवाई करन्यासाठी एनएसए अजीत डोभाल, आयबी प्रमुख तपन डेका आणि रॉचे प्रमुख सामंत गोयल यांच्यासोबत एक महत्वाची बैठक केली होती. यात पीएफआयच्या देश विरोधी कारवाया जमवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता.
रात्रीतूनच छापेमारी -
पीएफआयवर सर्जिकल स्ट्राइक करण्यापूर्वी गुप्तचर संस्थांच्या वेगवेगळ्या चमूने पीएफआयच्या अशा प्रत्येक सदस्यासंदर्भात माहिती गोळा केली होती, ज्याच्यापासून देशाच्या सुरक्षिततेला धोका होता. पीएफआयविरोधात काही रेड, अशा लोकेशन्सवर झाल्या, जेथे एनआयए आणि ईडीच्या टीमलाही धोका होता. यामुळे, छापे अशा पद्धतीने प्लॅन करण्यात आले होते, की सकाळी या छाप्यांसंदर्भात लोकांना माहिती होईपर्यंत सर्व टीम आपापल्या सुरक्षित ठिकाणी परत आलेल्या असतील. महत्वाचे म्हणजे झालेही असेच. सकाळी आठ वाजेपर्यंत अधिकांश टीम आरोपींना घेऊन हेडक्वार्टरवर परतले होते.