खलिस्तानवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई; अमृतसर, चंडीगढमधील संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 01:55 PM2023-09-23T13:55:37+5:302023-09-23T13:56:06+5:30
पन्नू सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो तेथून सतत्यानं व्हिडीओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) खलिस्तानवादी आणि बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिसचा (SFJ) नेता गुरपतवंत सिंग पन्नू याची मालमत्ता जप्त केली आहे. पंजाबमधील अमृतसर आणि चंडीगढमधील मालमत्तेवर एनआयएनं कारवाई केली. पन्नू सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो तेथून सतत्यानं व्हिडीओ जारी करत भारताविरोधात गरळ ओकत आहे.
एनआयएनं पन्नूच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यामध्ये अमृतसर जिल्ह्याच्या बाहेरील खानकोट या वडिलोपार्जित गावातील शेती आणि सेक्टर १५, सी चंदीगडमधील त्याच घर यांचा समावेश आहे. आता या मालमत्तेवरील पन्नूचा हक्क संपला असून ही सरकारी मालमत्ता असेल असा या जप्तीचा अर्थ आहे.
२०२० मध्येही त्याच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. याचा अर्थ असा होता की तो मालमत्ता विकू शकणार नव्हता. परंतु या पावलानंतर पन्नूनं मालमत्तेचे मालकी हक्क गमावले आहेत.
पन्नूनं दिली धमकी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात झालेल्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. खलिस्तानवादी गुरपतवंत सिंग पन्नूने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकावत देश सोडण्यास सांगितलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत कॅनडातील हिंदूंनी ट्रूडो सरकारला एक पत्रही लहिलंय. यामध्ये पन्नूचं भाषण हे हेट क्राईम म्हणून नोंदवण्यात यावं अशी विनंती केलीये.
कोण आहे पन्नू?
गुरपतवंत सिंग पन्नू हा मूळचा पंजाबमधील खानकोट येथील असून तो सध्या अमेरिकेचा नागरिक आहे. पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेऊन पन्नू परदेशात गेला. तेव्हापासून तो कॅनडा आणि अमेरिकेत राहत आहे. परदेशात राहून तो खलिस्तानी कारवाया करत असून वेळोवेळी व्हिडीओ जारी करून भारत सरकारविरुद्ध अनेकदा त्यानं गरळ ओकली. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीनं, त्याने शिख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (SFJ) नावाची संघटना देखील स्थापन केली आहे. या संघटनेवर २०१९ मध्ये भारताने बंदी घातली होती.