मोदींपाठोपाठ एनआयए देखील अमेरिकेला जाणार; दुतावासांवर हल्ले प्रकरणी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:12 PM2023-06-20T12:12:17+5:302023-06-20T12:12:33+5:30
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता.
अमेरिका आणि कॅनडाच्या भारतीय दुतावासांवर काही महिन्यांपूर्वी हल्ले करण्यात आले होते. याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए करत होती. खलिस्तानी समर्थकांनी मार्च महिन्यात हे हल्ले केले होते. यानंतर इंग्लंडमधील भारतीय उच्चायोगासमोरही हिंसक आंदोलन आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एनआयए अमेरिकेला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मार्चमध्ये झालेल्या हल्ल्यांच्या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. आता कॅनडा आणि अमेरिकेतील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर झालेल्या हिंसक निदर्शनांप्रकरणी एनआयएने गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणेचे पथक लवकरच अमेरिका आणि कॅनडाला जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने हे प्रकरण एनआयएकडे वर्ग केले आहे. एनआयएने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्यादरम्यान ग्रेनेडही फेकण्यात आले होते. या प्रकरणी एनआयएने यूएपीए आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात खलिस्तानी दहशतवाद्यांच्या समर्थक लिंकची माहिती समोर आली आहे.
लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात तिरंग्याच्या अवमान केल्या प्रकरणी NIA चे पथक लंडनला गेले होते. 45 संशयित हल्लेखोरांची छायाचित्रे देखील NIA ने प्रसिद्ध केली आहेत. आता हे पथक अमेरिकेला जाणार आहे.