दिल्लीत NIA ची मोठी कारवाई! तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्ह्यांमध्ये फसविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 08:55 IST2025-01-05T15:45:31+5:302025-01-06T08:55:36+5:30
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने आरोपीच्या घरातून मोबाईल फोन आणि टॅब्लेटसारखे अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

दिल्लीत NIA ची मोठी कारवाई! तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून सायबर गुन्ह्यांमध्ये फसविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी (४ जानेवारी) दिल्लीच्या दक्षिण भागात असलेल्या जामिया नगरमध्ये मोठी कारवाई केली. यादरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने मानवी तस्करी आणि सायबर गुलामगिरीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित आरोपीच्या घरावर छापा टाकला.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने आरोपीच्या घरातून मोबाईल फोन आणि टॅब्लेटसारखे अनेक डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. याशिवाय, बँकेचे पासबुक, चेकबुक, डेबिट कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. या कागदपत्रांमध्ये रॅकेटच्या आर्थिक नेटवर्कची माहिती आहे. यामुळे तपासात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण कामरान हैदर नावाच्या आरोपीशी आणि त्याच्या साथीदारांशी संबंधित आहे, जे भारतीय तरुणांची फसवणूक करुन लाओसमध्ये पाठवत होते. तेथे या तरुणांना ‘गोल्डन ट्रँगल’ परिसरात सायबर गुन्हे करण्यास भाग पाडत होते.
युरोप आणि अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी या तरुणांचा वापर करण्यात येत होता. जगभरात सायबर फसवणूक करणे हा या रॅकेटचा उद्देश होता आणि या कामासाठी त्यांनी भारतीय तरुणांना आपल्या जाळ्यात ओढले होते.