एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 12:56 PM2024-09-13T12:56:25+5:302024-09-13T12:58:04+5:30
एनआयएने ५ सप्टेंबर रोजी इंदरपाल सिंह गाबा या अफगाण वंशाच्या ब्रिटिश नागरिकावर आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे.
एनआयएने खलिस्तानी विरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. पंजाबमध्ये अनेक ठिकाणी धाड टाकण्यात आली आहे. मोंगा, अमृतसर, गुरुदासपूर, जालंधर आणि इतर भागात १४ ठिकाणी छापे टाकण्यात आले. गेल्या वर्षी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एनआयएने मोठी कारवाई केली आहे. लंडन हल्ल्याप्रकरणी एनआयएच्या तपासात महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. यापूर्वी ५ सप्टेंबर रोजी एनआयएने अफगाण वंशाच्या यूके नागरिक इंदरपाल सिंह गाबाविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. गाबा यांच्यावर गेल्या वर्षी २२ मार्च रोजी भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतविरोधी आंदोलनात भाग घेतल्याचा आरोप आहे.
२५ एप्रिल रोजी अटक करण्यात आलेल्या इंदरपाल सिंह गाबाला यापूर्वी डिसेंबर २०२३ मध्ये लंडनहून पाकिस्तानमार्गे आल्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. गाबा यांनी आंदोलनात भाग घेऊन फुटीरतावादी अजेंड्याला पाठिंबा दिल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे. अमृतपाल सिंह आणि त्याची संघटना वारिस पंजाब दे यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईवर प्रभाव पाडणे हा त्याचा उद्देश होता.
भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ला हा खलिस्तानी कारण पुढे करण्याच्या मोठ्या रणनीतीचा भाग होता, अस एनआयएच्या तपासात पुढे आले आहे. लंडनचा हल्ला पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंह विरुद्ध केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आला होता, यांचा खलिस्तानचा अजेंड असल्याचा खुलासा झाला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये खलिस्तान समर्थकांनी ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर गोंधळ घातला होता. निदर्शनादरम्यान अमृतपाल सिंह यांच्या पोस्टर्ससह खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी 'फ्री अमृतपाल सिंह', 'वीवाँट जस्टिस' आणि 'वीस्टँडविथ अमृतपालसिंह' अशा घोषणाही देण्यात आल्या. या घटनेचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.