काश्मिरमधील टेरर फंडिंग प्रकरणी हुर्रियत नेत्यांविरोधात एनआयएकडे सबळ पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 02:09 PM2017-10-02T14:09:38+5:302017-10-02T14:13:56+5:30

काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे.

NIA's strong evidence against Hurriyat leaders in Kashmir for Terror funding | काश्मिरमधील टेरर फंडिंग प्रकरणी हुर्रियत नेत्यांविरोधात एनआयएकडे सबळ पुरावे

काश्मिरमधील टेरर फंडिंग प्रकरणी हुर्रियत नेत्यांविरोधात एनआयएकडे सबळ पुरावे

Next

नवी दिल्ली - काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर आता सय्यद अली शहा गिलानी, मीरवाइज उमर फारुख आणि यासिन मलिक यासारख्या मोठ्या फुटिरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची पूर्ण तयारी एनआयएने केल्याचे सांगण्यात येत आहे. 
या प्रकरणात एकूण पाच आरोपी असून, साक्षीदारांनी सीआरपीसी कलम 164 अन्वये त्यांच्याविरोधात साक्ष दिली आहे. अशी साक्ष न्यायालयात ग्राह्य धरली जाते. या साक्षींमध्ये हुर्रियतच्या मोठ्या नेत्यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार माजवण्यासाठी पाकिस्तानकडून कशाप्रकारे आर्थिक मदत घेतली होती, हे सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.  
त्याबरोबरच अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या घरावर मारण्यात आलेल्या छाप्यामधून काही महत्त्वपूर्ण  कागदपत्रे एनआयएच्या हाती लागली आहेत. हवालाच्या माध्यमातून पाकिस्तानस्थित स्रोतांमधून हुर्रियत नेत्यांपर्यंत कशाप्रकारे पैसे पोहोचतात, याचा संपूर्ण लेखाजोखा या कागदपत्रामध्ये आहे. ही कागदपत्रे हुर्रियत नेत्यांना न्यायालयात उघडे पाडण्यासाठी पुरेशी असल्याचे बोलले जात आहे. 
 हुर्रियतच्या एका बड्या नेत्याच्या निकटवर्तीयासह अन्य पाच जणांना मॅजिस्ट्रेटसमोर साक्ष देण्यासाठी राजी करण्यात आले असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे. या साक्षींमुळे हुर्रियतच्या नेत्यांनी पाकिस्तानकडून मिळणाऱ्या पैशांचा उपयोग काश्मीर खोऱ्यात दहशत माजवण्यासाठी केल्याचे न्यायालयासमोर अधोरेखित होईल. त्याबरोबरच काश्मीरमध्ये हिंसाचार माजवण्यासाठी करण्यात येत असलेल्या अर्थपुरवठ्यामध्ये पाकिस्तानच्या दिल्लीस्थित दुतावासाचाही हात असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कलम 164 अन्वये नोंदवण्यात आलेल्या साक्षी आणि कागदोपत्री पुराव्यांच्या आधारावर हुर्रियतच्या कट्टरवादी गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी, मवाळमतवादी गटाचे हुर्रियतचे प्रमुखी मीरवाइज उमर फारुख आणि जेकेएलएफचे प्रमुख यासिन मलिक यांच्याविरोधात पाश आवळण्यात येऊ शकतो. दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्या प्रकरणीच्या या खटल्यात एनआयए गिलानी, मीरवाइज आणि यासिन मलिक यांची चौकशी करण्याचीही शक्यता आहे. मात्र या संधीचा फायदा हुर्रियत नेत्यांना काश्मीरप्रकरणात सरकारसोबत आणण्यासाठी करण्यात यावा, असे सरकारमधील एका गटाचे मत आहे.  
काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवली जाते हे आता उघड झाले होते.  गेल्या आठ वर्षात दहशत माजवण्यासाठी पाकिस्तानने हुर्रियतच्या नेत्यांना तब्बल 1500 कोटी रुपये देण्यात आल्याचे हुर्रियत नेत्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून उघड झाले होते. मात्र लबाड हुर्रियत नेत्यांनी यातील अर्ध्या पैशातून काश्मीरमध्ये अशांतता माजवली तर अर्धे पैसे स्वत:ची मालमत्ता बनवण्यामध्ये गुंतवले. एनआयएने काही महिन्यांपूर्वी ही कारवाई केली होती.

Web Title: NIA's strong evidence against Hurriyat leaders in Kashmir for Terror funding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.