पबमधील नायट्रोजन कॉकटेलने पोटात पडले छिद्र
By Admin | Published: July 4, 2017 04:31 PM2017-07-04T16:31:04+5:302017-07-04T16:39:47+5:30
दिल्लीतील एका 30 वर्षीय व्यावसायिकांने पबमधील ड्रिंकसोबत लिक्विड नायट्रोजनचे सेवन केल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 04 - सध्या तरुणांमध्ये नव-नवीन पदार्थांची चव चाखण्याची क्रेझ वाढल्याचे दिसून येते. मात्र, अनेक वेळा अशी क्रेझ कधी अंगलट येईल हे सांगता येणार नाही. कारण, दिल्लीतील एका 30 वर्षीय व्यावसायिकांने पबमधील ड्रिंकसोबत लिक्विड नायट्रोजनचे सेवन केल्याने त्याला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुमित प्रसाद (नाव बदललेले आहे) हा व्यावसायिक गुडगाव येथील एका पबमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने पबमधील लेटेस्ट लिक्विड नायट्रोजन असलेले कॉकटेल ऑर्डर केले. असे सांगण्यात येते की, ड्रिंक लवकर फ्रीज करण्यासाठी त्यामध्ये लिक्विड नायट्रोजनचा वापर करण्यात येतो. दरम्यान, या कॉकटेलचे सेवन केल्यानंतर सुमितला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर, तो जमीनीवर कोसळला असता त्याला लगेचच मित्रांनी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचे पोट फुगले होते. तसेच, रुग्णालयात दाखल केल्यानंतर रक्त तपासणीत समजले की, त्याच्या शरिरामध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त झाले होते.
कोलंबिया एशिया रुग्णालयाचे डॉक्टर अमित गोस्वामी यांनी सांगितले की, सुमितला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याचा पल्स रेट वाढला होता आणि रक्तदाब कमी झाला होता. तसेच, सीटी स्कॅन केल्यानंतर समजले की पोटाखालील भागाला छिद्र पडल्याचे. आम्ही त्याच्यावर उपचार केले असून त्याला उपचारानंतर तीन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आता तो सुखरुप आहे.
दरम्यान, ही घटना 13 एप्रिल रोजी घडली होती.