नायब राज्यपाल, केजरींमध्ये ‘जंग’
By admin | Published: May 17, 2015 01:49 AM2015-05-17T01:49:48+5:302015-05-17T01:49:48+5:30
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात शनिवारी खुले युद्ध छेडले आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप)सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात शनिवारी खुले युद्ध छेडले आहे. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलिन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपालांना राज्यघटनेच्या मर्यादा ओलांडू नका, अशी ताकीद दिली.
नायब राज्यपाल प्रशासन आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नायब राज्यापालांनीही मुख्यमंत्र्यांच्या पत्राला लगेच प्रत्युत्तर देत राज्यघटनेअंतर्गत आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांची आपल्याला संपूर्ण जाणीव असल्याचे ठासून सांगितले. गामलिन यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तासाभरातच केजरीवाल यांनी जंग यांना अत्यंत कडक शब्दात पत्र लिहून निर्वाचित सरकारला निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर लावला. राष्ट्रपतींना या मुद्याची माहिती देण्यासाठी आपण त्यांची वेळ मागितली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान जंग यांच्या आदेशानुसार शकुंतला गामलिन यांना नियुक्तीचे पत्र जारी करणारे सेवा विभागाचे प्रधान सचिव अरिंदम मजुमदार यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. केजरीवाल यांनी गामलिन यांना एका पत्राद्वारे त्यांची नियुक्ती नियमबाह्ण असल्याचे सांगून पदभार स्वीकारु नका, अशी सूचना केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांची सूचना धुडकावून गामलिन यांनी काही तासातच हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. (लोकमत न्यूज नेटवर्क)