केमिकल मिसळून नायजेरियन नागरिक बनवत होते ड्रग्ज; स्फोटात २ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 06:04 PM2024-02-28T18:04:09+5:302024-02-28T18:05:01+5:30
नायजेरियन वंशाचे चार नागरिक १० फेब्रुवारी रोजी पश्चिम कमल विहार येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते.
नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील बुरारी भागातील पश्चिम कमल विहार येथील एका घरात भीषण स्फोट झाला. या स्फोटात जखमी झालेल्या दोन नायजेरियन नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नायजेरियन नागरिक भाड्याचे घर घेऊन त्यामध्ये अमली पदार्थ बनवत होते, असे सांगण्यात येत आहे. यादरम्यान मोठा स्फोट झाला. सध्या बुरारी पोलीस स्टेशनने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणाची माहिती नायजेरियन दूतावासालाही देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायजेरियन वंशाचे चार नागरिक १० फेब्रुवारी रोजी पश्चिम कमल विहार येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहायला आले होते. त्यात क्रिस्टन आणि कंबारी नावाच्या महिलाही होत्या. दोघांकडे डिसेंबरपर्यंत व्हिसा होता. २४ फेब्रुवारीच्या रात्री या फ्लॅटमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर भीषण आग लागली, ज्यात दोन जण गंभीररीत्या भाजले. मात्र एवढे होऊनही आजूबाजूच्या लोकांनी व त्याने स्वत: पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला नाही किंवा कोणालाही या प्रकरणाची माहिती दिली नाही.
दोन्ही जखमींना कसेतरी उत्तम नगर येथील एका तज्ज्ञाच्या घरी नेण्यात आले, तेथे त्यांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून त्यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आले. येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात जखमींचा पत्ता उत्तम नगर असा देण्यात आला होता, त्यामुळे रुग्णालयाने या संपूर्ण प्रकरणाची माहिती उत्तम नगर पोलीस ठाण्यात दिली. मात्र हा अपघात बुरारी येथे झाला, त्यामुळे हे प्रकरण बुरारी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. दोन्ही नायजेरियन नागरिकांच्या मृत्यूची बातमी येताच पोलीस तपास करत होते.
केमिकल टाकताच स्फोट झाला-
बुरारी पोलीस ठाण्यात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला. घराचा मालक नफीस याचे बंगाली कॉलनीत घर असल्याचे तपासात उघड झाले. बंगाली कॉलनीतील एका व्यक्तीने नायजेरियन नागरिकांची नफीसशी ओळख करून दिली आणि पश्चिम कमल विहारच्या या निर्जन भागात त्यांना भाड्याने घर मिळवून दिले. अशी माहिती समोर आली आहे की, घटनेच्या वेळी मयत आणि त्याचे दोन मित्र काही नशेचे पदार्थ बनवत होते, त्यात केमिकल टाकत असताना स्फोट झाला आणि भाड्याच्या घराला आग लागली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
सध्या बुरारी पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे. घटनेच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी नायजेरियन दूतावासालाही या घटनेची माहिती दिली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.