उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू जारी, लग्नाला 200 पेक्षा अधिक लोकांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 03:46 PM2021-12-24T15:46:18+5:302021-12-24T15:59:21+5:30
देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
लखनौ - देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटनंतर आता ओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,79,133 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशात गुरुवारी ओमायक्रॉनचे 64 नवे रुग्ण सापडले. त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लादण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने शनिवारपासून राज्यात रात्रीची संचारंबदी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
देशात आत्तापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 374 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये, ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. त्यामुळे, उत्तर प्रदेश सरकारने 25 डिसेंबरपासून राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, लग्नकार्यासाठी केवळ 200 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा, अधिक लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय टीम -09 ला निर्देश दिले आहेत. त्यानुसार, बाजारात मास्क नाही, तर सामान नाही.. अशी घोषणा करण्यात आली असून व्यापाऱ्यांना याबाबत जागरुक करण्याचेही त्यांनी सूचवले आहे. रस्त्यावर फिरताना आणि बाजारात खरेदी करताना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. लोकजागृती अधिक सक्षम बनवून पोलिसांनाही तैनात करावे, असेही योगींनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे ट्रेसिंग अन् टेस्टींग करण्यात यावी, मग तो व्यक्ती कुठल्याही राज्यातून येवो किंवा विदेशातून येवो, असे निर्देशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर अधिक सतर्कता राखण्यात यावी. तसेच, गरजेनुसार लोकांना क्वारंटाईन आणि रुग्णालयात भरती करण्यात यावे, असेही योगींनी बजावले आहे.
केंद्रानेच दिले आहेत निर्देश
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हायलेव्हल मिटिंग घेतली होती. तत्पूर्वी केंद्र सरकारने ओमायक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्यांच्या कोणत्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यांचा डबलिंग रेट, क्लस्टरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, नाईट कर्फ्यू आणि गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा, असे निर्देशही दिले आहेत.