मृतदेहासह रुग्णालयाबाहेर काढली रात्र
By Admin | Published: September 6, 2016 04:09 AM2016-09-06T04:09:57+5:302016-09-06T04:09:57+5:30
मुलीचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका महिलेला रुग्णालयाच्या अपघात कक्षाबाहेर रात्र काढावी लागली.
मेरठ : मुलीचा मृतदेह गावी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे एका महिलेला रुग्णालयाच्या अपघात कक्षाबाहेर रात्र काढावी लागली. रुग्णवाहिकेसाठी ही महिला मुलीचा मृतदेह सोबत घेऊन या रुग्णालयातून त्या रुग्णालयात भटकत राहिली; मात्र कोणाच्याही हृदयाला पाझर फुटला नाही.
बागपत जिल्ह्याच्या गौरीपूर येथील रहिवासी गुलनादला (दोन) विषाणुसंसर्ग झाला होता. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी गुलनादची आई इमराना यांना मुलीला लाला लजपत राय रुग्णालयात हलविण्यास सांगितले. हे रुग्णालय मेरठमध्ये आहे. इमराना यांनी मुलीला राय रुग्णालयात आणले. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
तिचा मृतदेह गावी नेण्याचे आव्हान होते. दु:ख सावरून त्यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू केले. रुग्णवाहिका चालकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. त्यांचे गाव मेरठपासून ५० कि. मी. अंतरावर आहे; मात्र ते मेरठ जिल्ह्यात नसल्याचे कारण देऊन रुग्णवाहिका चालकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. मी या प्रकरणाची चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करेन. असे मी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याना सांगेन, असे मेरठचे जिल्हाधिकारी जगतराज त्रिपाठी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)