लखबीरने सर्वलोह ग्रंथाला हात लावल्यामुळे निहंग संतापले, जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:24 AM2021-10-17T11:24:51+5:302021-10-17T11:25:11+5:30
Singhu border Lakhbir Singh Lynching: लखबीर सिंह निहंगांचे तंबू साफ करणे आणि त्यांचे कपडे धुण्याचे काम करायचा.
नवी दिल्ली: राजधानी दिल्ली आणि हरियाणाची सीमा असलेल्या सिंघू बॉर्डरवर शुक्रवारी दलित तरुण लखबीर सिंगची निहंगांकडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याचे हात आणि पाय कापून मृतदेह पोलिस बॅरिकेडला लटकवण्यात आला होता. पण, आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. त्या दिवशी नेमकं काय झालं आणि लखबीरची हत्या का करण्यात आली, ही माहिती सिंघू सीमेवर सुरू असलेल्या निदर्शनामध्ये सामील असलेल्या एका व्यक्तीने एका वृत्त वाहिनीला सांगितली आहे.
लखबीर सिंग निहंगांची सेवा करत असे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत लखबीर सिंग सिंघु बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या निहंगांची सेवा करायचा. तो त्यांच्यासोबतच त्यांच्या तंबूत राहत होता. निहंगांनी लखबीर सिंगला तंबूची साफसफाई करण्याचे आणि त्यांचे कपडे धुण्याचे काम दिले होते. त्या बदल्यात निहंग त्याच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करत असत.
घटनेच्या दिवशी काय झालं?
14-15 ऑक्टोबरच्या मध्यरात्री रात्री लखबीर सिंग झोपण्यापूर्वी निहंगांचा तंबू स्वच्छ करत होता, तेव्हा त्यांने निहंगांच्या तंबूत ठेवलेले 'सर्वलोह ग्रंथ' ठिकाणावरून बाजूला काढून स्वच्छ करण्यास सुरुवात केली. त्याने चुकून सर्वलोह ग्रंथ त्याच्या पायाजवळ ठेवला, हे पहून एक निहंग चांगलाच भडकला आणि त्याने लखबीर सिंगला मारहाण सुरू केली.
या दरम्यान इतर निहंगांनीही त्याला मारहाण केली. यानंतर त्याचे हात-पाय बांधून निहंग जथेदार अमनदीप सिंग आणि बाबा नारायण सिंह यांच्यासमोर सादर करण्यात आले. अमनदीप सिंग आणि बाबा नारायण सिंह यांनी निहंगांच्या लखबीर सिंगची चौकशी केली आणि त्याचे हात-पाय कापण्याचा आदेश दिला. या सर्व घटनेत लखबीरचा मृत्यू झाला.