निकम, भांडारकर, देवगण, खेर, रजनीकांत, प्रियांका पद्मचे मानकरी

By Admin | Published: January 26, 2016 03:32 AM2016-01-26T03:32:18+5:302016-01-26T03:32:18+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी

Nikam, Bhandarkar, Devgan, Kher, Rajinikanth, Priyanka Padma awardee | निकम, भांडारकर, देवगण, खेर, रजनीकांत, प्रियांका पद्मचे मानकरी

निकम, भांडारकर, देवगण, खेर, रजनीकांत, प्रियांका पद्मचे मानकरी

googlenewsNext

पुरस्कार जाहीर : धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषण
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि माध्यम सम्राट रामोजी राव यांची पद्मविभूषणसाठी निवड झाली आहे.
पद्मभूषण पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या एकूण १९ मान्यवरांमध्ये माजी नियंत्रक व महालेखाकार (कॅग) विनोद राय, माध्यम समूह बेनेट कोलमॅन अ‍ॅण्ड कंपनीच्या अध्यक्ष इंदू जैन, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, आध्यात्मिक गुरू दिवंगत स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी तेजोमायानंद आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल, उद्योगपती पलोनजी शपूरजी मिस्त्री, मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव आणि प्रख्यात आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांचाही समावेश आहे. मुंबई बॉम्बस्फोट तसेच अतिरेकी हल्ल्यातील सरकारी वकील तसेच प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम व दिग्दर्शक मधुर भांडारकर हे पद्मश्रीचे मानकरी असून, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार राम व्ही. सुतार, मणिपुरी नाट्यकलावंत हसनम कन्हैयालाल, हिंदी आणि तेलगू लेखक यारालगड्डा लक्ष्मी प्रसाद, संस्कृतचे विद्वान एन.एस. रामानुज तातचार्य, पंजाबी पत्रकार बरजिंदरसिंग हमदर्द, गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट डी. नागेश्वर रेड्डी आणि शास्त्रज्ञ ए.व्ही. रामाराव हे पद्मभूषणचे मानकरी आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, गायक उदित नारायण यांना पद्मभूषण तर अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. (वृत्तसंस्था)
११२ जण पुरस्काराने सन्मानित
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) माजी प्रमुख व्ही.के. अत्रे, कॅन्सरतज्ज्ञ आणि अडयार कॅन्सर संस्थेचे प्रमुख डॉ. व्ही. शांता, प्रसिद्ध भरतनाट्यम् आणि कुचिपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती, शास्त्रीय गायिका गिरिजादेवी आणि भारत-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित हेसुद्धा पद्मविभूषणचे मानकरी ठरले आहेत.
३६५ जवानांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान
अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ३६५ जवानांचा विविध पदके देऊन गौरव केला जाणार असून, राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांना सर्वोच्च मानाच्या ‘अशोक चक्र’ या पदकाने मरणोत्तर सन्मानित केले जाईल.
महाराष्ट्राचे साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. जम्मू- काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना संतोष महाडिक हुतात्मा झाले होते.
पुरस्कारांमध्ये अशोक चक्र, ४ कीर्ती चक्र, ११ शौर्य चक्र, ४८ सैन्य पदक (शौर्य) ४ नौदल पदक (शौर्य), २ वायूदल पदक (शौर्य), २९ परम विशिष्ट सेवा पदक, ५ उत्तम युद्व सेवा पदक, ४ अति विशिष्ट सेवा पदक, २० युद्ध सेवा पदक, ३७ सैन्य पदक (कर्तव्य समर्पण), ८ नौदल पदक (कर्तव्य समर्पण), १६ वायूदल पदक (कर्तव्य समर्पण), ११८ विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे.राज्यातील ५० जणांना
राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुंबई/ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ८४१ पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांचे शौर्य आणि प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस पदक बहाल करून गौरव केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ५० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकासाठी (पीपीएमजी) ३, पोलीस पदकासाठी (पीएमजी) १२१, उत्कृष्ट सेवेबद्दलच्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी ८९ आणि विशेष सेवेबद्दलच्या पोलीस पदकासाठी ६२८ पोलिसांची निवड केली.

Web Title: Nikam, Bhandarkar, Devgan, Kher, Rajinikanth, Priyanka Padma awardee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.