त्याला 'हे' यश बघताच आलं नाही, 'भारत बंद'च्या वेळी झाला होता निखिलचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 09:59 AM2018-04-20T09:59:27+5:302018-04-20T09:59:27+5:30
निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत.
गाझियाबाद- एससी /एसटी कायद्याला शिथिल करण्याविरोधात 2 एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या भारत बंदच्या वेळी काही ठिकाणी हिंसाचारही झाला. यावेळी गाझियाबादमध्ये राहणाऱ्या एका पाचवीत शिकणाऱ्या मुलाचा मृत्यू झाला होता. निखिल असं त्या मुलाचं नाव आहे. पण आज निखिलचं यश पाहून त्याच्या आई-वडिलांना अश्रु अनावर होत आहेत. पाचवीत शिकणाऱ्या निखिलने परीक्षेमध्ये टॉप केलं आहे. परीक्षेसाठी इतकी मेहनत घेतली पण ते यश पाहायला आज निखिल जिवंत नाहीये. नवभारत टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
कृशियन कॉलनी भागूमध्ये राहणारा निखिल भारत बंदच्या दिवशी सिब्बनपुरामध्ये राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घरी गेला होता. सकाळी जवळपास 11 वाजेच्या सुमारास तो गोशाळेपासून चालत घरी चालला होता. त्याचवेळी तिथे आंदोलकर्त्यांनी पोलिसांच्या एका बाईकला आग लावल्याने पळापळ झाली. त्या धावपळीत निखिलला कुणीतरी धक्का दिला व तो आगीत पडला, असा आरोप निखिलच्या वडिलांनी केला आहे. मुलगा आगीच्या तावडीत सापडला असल्याचं आम्ही पाहिलं लगेचच आग विझवून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला असं स्थानिकांनी सांगितलं.
मुलाच्या वडिलांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं तेव्हा पोलिसांनी आधी मुलावर उपचार करण्याचा सल्ला दिला. नंतर मुलगा बरा झाल्यावर तक्रार दाखल करू, असं पोलिसांनी सांगितलं होतं. आंदोलनादरम्यान मुलगा जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी मीडियालाही दिली, असा आरोप आहे. पोलिसांनी हे सगळं मुद्दाम केलं, असा आरोप केला जातो आहे.