काळा पैसा धारकांच्या यादीत निलेश राणे, स्मिता ठाकरेंचे नाव
By admin | Published: February 9, 2015 09:33 AM2015-02-09T09:33:14+5:302015-02-09T12:18:38+5:30
स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी या खासगी बँकेत काँग्रेस नेते नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे तसेच बाळासाहेब ठाकरेंची सूना स्मिता ठाकरे यांचे नाव असल्याचे समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवणा-या ६० खातेधारकांची नावे आज केंद्र सरकार जाहीर करणार असतानाच एचएसबीसी बँकेतील भारतीय खातेधारकांची संख्या आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीच्या दुप्पट असल्याचे समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत काँग्रेस नेते नारायण राणेंची पत्नी नीलम तसेच पुत्र निलेश राणे आणि बाळासाहेब ठाकरेंची सूना स्मिता ठाकरे यांचे नाव असल्याचे समोर आले आहे.
फ्रान्स सरकारने २०११ साली त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खातेदारांची यादी भारत सरकारला दिली होती, त्यात ६२८ नावे होती, मात्र हीच संख्या ११९५ इतकी असल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. तसेच या खातेधारकांच्या खात्यांमध्ये एकूण २५ हजार ४२० कोटी रुपये असलेही त्यात म्हटले आहे. या खातेधारकांमध्ये अनेक बडे उद्योगपती तसेच राजकारण्यांचाही समावेश असून अभिनेत्री महिमा चौधरीच्या नावाचाही समावेश असल्याचा गौप्यस्फोट बातमीत करण्यात आला आहे.
या वृत्तानुसार, या यादीत देशातील नामांकित उद्योगपती, हिरेव्यापारी, राजकारणी तसेच अनिवासी भारतीयांचा समावेश आहे. मुकेश अंबानी, अनिल अंबानी, नरेशकुमार गोयल, भद्रश्याम कोठारी, यशोवर्धन बिर्ला इत्यादी नावांचा या यादीत समावेश आहे. एचएसबीसीकडे असलेल्या भारतीय खातेधारकांपैकी २७६ खातेधारकांच्या खात्यांमध्ये दहा लाख डॉलर इतकी रक्कम असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम व त्यांचा मुलगा निलेश राणे यांचा तसेच बाळासाहेब ठाकरे यांची सून स्मिता जयदेव ठाकरे यांचेही नाव यादीत असल्याचे बातमीत म्हटले आहे. 'आपल्या या सर्वाशी काहीही संबंध नसून आपले असे कोणतेही खाते नाही' अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली असून स्मिता ठाकरे यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान या यादीत महिमा (रितू) चौधरी या एकमेव अभिनेत्रीचे नावे आहे. रितू चौधरी असे तिचे मूळ नाव असून नंतर ते महिमा असे ठेवण्यात आले होते. एचएसबीसीच्या यादीत तिचे नाव टॉप मॉडेल आणि अभिनेत्री असे नमूद करण्यात आले आहे. महिमाने मात्र याप्रकरणी आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.