नऊ नक्षलींचा खात्मा, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:52 AM2024-09-04T06:52:02+5:302024-09-04T06:52:25+5:30
Chhattisgarh News: छत्तीसगडमधील बस्तर भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, ३०३ रायफल व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दंतेवाडा : छत्तीसगडमधील बस्तर भागात मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी नऊ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. यात सहा महिला नक्षलींचा समावेश आहे. त्यांच्याकडून एसएलआर रायफल, ३०३ रायफल व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
दंतेवाडा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या जंगलात ही चकमक झाली. बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, पश्चिम बस्तर विभाग संघटनेतील नक्षलवाद्यांचा या परिसरात वावर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड, केंद्रीय राखीव पोलिस दल यांचा समावेश असलेल्या जवानांनी या परिससरात संयुक्तरीत्या शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. (वृत्तसंस्था)
१३ नक्षलींना अटक
- छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून सुरक्षा दलांनी तेरा नक्षलवाद्यांना अटक केली आहे. त्यातील सात जणांना गंगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रदेशातून रविवारी पकडण्यात आले, तर अन्य सहा जणांना तारेम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भागातून सोमवारी जेरबंद करण्यात आले.
-अटक करण्यात आलेले सर्व जण पुरुष नक्षलवादी असून त्यांचे वय २० ते ५५ वर्षांच्या दरम्यान आहे.