घशातून काढल्या नऊ सुया!; मांत्रिकाने सुया टोचल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:09 AM2018-08-02T03:09:36+5:302018-08-02T03:13:19+5:30
येथील निल रतन सरकार सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या घशात अडकलेल्या नऊ सुया काढल्या.
कोलकाता : येथील निल रतन सरकार सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या घशात अडकलेल्या नऊ सुया काढल्या.
अपरुपा बिश्वास नावाची ही मुलगी मुळची कृष्णनगरमधील असून मंगळवारी तिच्यावर शस्त्र्रक्रिया करण्यात आली. सुया गिळल्यामुळे तिच्या घशात अडकलेल्या नव्हत्या. तर बाहेरून टोचलेल्या सुया मोडून मांसल भागात अडकल्या होत्या. इस्पितळाचे ‘ईएनटी’ सर्जन नमोज मुखर्जी यांनी सांगितले की, गळ््याच्या मांसामध्ये रुतलेल्या या सुया अन्ननलिकेच्या आत गेलेल्या नव्हत्या.
ही मुलगी सध्या बोलण्याच्या अवस्थेत नाही. तिच्या पालकांनीही एवढ्या सुया मुलीच्या गळ््यात कशा अडकल्या याविषयी मौन पाळले. मात्र या कुटुंबाच्या कृष्मनगरमधील शेजाऱ्यांनी कदाचित मांत्रिकाने या सुया टोचल्या असाव्यात, अशी शंका व्यक्त केली. या मुलीचा मोठा भाऊ तीन वर्षांपूर्वी वारला. नंतर तिच्या आई-वडिलांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण तीही दगावली. कुटुंबातील या लागोपाठच्या दोन दु:खद घटनांमुळे ही मुलगी घोर नैराश्यात गेली. त्यावर उपचार करण्यासाठी तिला मांत्रिकाकडे नेण्यात आले होते, असे शेजाºयांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)