पूर्व लडाखबाबत भारत-चीनच्या लष्करात झाल्या चर्चेच्या नऊ फेऱ्या: परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 06:17 AM2021-02-07T06:17:05+5:302021-02-07T07:42:54+5:30
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
विजयवाडा : पूर्व लडाखमधील सीमेवरून आपापले सैन्य माघारी बोलाविण्यासंदर्भात भारत व चीनमधील लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. तोडगा काढण्यासाठी ही चर्चा यापुढेही सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिली.
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, या चर्चेतून आतापर्यंत कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. पूर्व लडाखमधील प्रश्न हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. तो प्रश्न सोडविताना भौगोलिक स्थिती, सैन्य कुठे नेमके तैनात आहे, तेथील स्थिती नेमकी कशी आहे या सर्व बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्याचा आढावा घेऊनच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.
पूर्व लडाख व अन्य प्रश्नांसंदर्भात भारत व चीन यांच्यामध्ये मंत्रिस्तरावर चर्चा होण्याची शक्यता आहे का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. एस. जयशंकर उत्तर देत होते. (वृत्तसंस्था)
नऊ महिने तणाव कायम
पूर्व लडाखमध्ये चीनच्या लष्कराने घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने हाणून पाडला होता. या भागात दोन्ही देशांमध्ये ५ मेपासून प्रचंड तणाव आहे. या सीमेवर दोन्ही देशांनी वाढीव सैन्य तैनात केले असून राजनैतिक, लष्करी पातळीवर झालेल्या चर्चांतून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.