'नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधातील कारवाईमुळे काश्मीर खो-यात दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 02:50 PM2017-11-13T14:50:21+5:302017-11-13T14:52:19+5:30
काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे
जम्मू - काश्मीर खो-यात गतवर्षीच्या आकडेवारीशी तुलना करता दगडफेकीच्या घटनांमध्ये 90 टक्के घट झाली असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी दिली आहे. यावेळी एस पी वैद यांनी काश्मीरमधील परिस्थिती सुधारल्याबद्दल तेथील लोकांना श्रेय दिलं आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये घट होण्यामागे राष्ट्रीय तपास यंत्रणांची छापेमारी हे एकमेव कारण नसून, नोटाबंदी आणि दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई जबाबदार असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. गतवर्षी दिवसाला दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत अशी माहिती त्यांनी दिली.
'काश्मीर खो-यात गतवर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटना पाहिल्यास, यावर्षी 90 टक्क्यांहून जास्त घट झाल्याचं समोर आलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे', असं एस पी वैद बोलले आहेत. 'जिथे गतवर्षी दिवसाला 50 हून जास्त दगडफेकीच्या घटना घडायच्या, तिछे सध्या असे अनेक आठवडे पहायला मिळत आहेत जेव्हा दगडफेकीची एकही घटना समोर येत नाहीये. लोकांच्या वृत्तीत आणि विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे.
'हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वांसाठी महत्वाचा आहे. खासकरुन काश्मीरमध्ये राहणा-या किंवा तेथील परिस्थितीचा सामना करणा-यांसाठी कायदा - सुव्यवस्था महत्वाचा विषय आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे.
'काश्मीर खो-यातील परिस्थिती खूप सुधारली आहे हे सहजपणे लक्षात येत आहे. संपुर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना समोर येत नाहीये. इतकंच नाही तर अनेकदा संपुर्ण आठवडा शांतता राहत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारी जेव्हा दगडफेकीच्या 40 ते 50 घटना होत असत, त्यातही घट झाली आहे', असं एस पी वैद बोलले आहेत.
'परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे परिस्थिती सुधारली असा दावा केला जात आहे. पण मी याच्याशी सहमत नाही. राष्ट्रीय तपास यंत्रणेमुळे मदत झाली, पण मुख्य श्रेय जातं ते काश्मीरमधील जनतेला. कदाचित त्यांनाही याचे तोटे लक्षात आले असतील. आपल्याच संपत्तीचं नुकसान करत, आपल्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर हल्ले करणं चुकीचं असल्याचं त्यांच्या लक्षात येत असाव. याशिवाय मुख्य दहशतवाद्यांवर करण्यात आलेली कारवाईही कारणीभूत आहे', असं एस पी वैद यांनी सांगितलं आहे.