Nirav Modi Exclusive : एक रंगबेरंगी हिरा जगभरात फिरवून नीरव मोदीने बँकांना लुटले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:02 PM2018-08-30T18:02:05+5:302018-08-30T18:39:34+5:30
नीरव मोदीच्या अमेरिकेतील तीन दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांच्या तपासाचा अमेरिकेकडून अहवाल सादर. आयात-निर्यातीचा खेळ करून फसविले.
नवी दिल्ली : पीएनबी घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने केवळ एका रंगबेरंगी हिऱ्याच्या मदतीने तब्बल 21.38 कोटी डॉलरची बिले दाखवून कर्ज उचलल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेच्या ब्लूमबर्गमधील एका रिपोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे. नीरव मोदीने परदेशांमध्ये असलेल्या आपल्याच कंपन्यांना आलटून पालटून हा हिरा विकला आणि त्याची बिले दाखवून हे कर्ज उचलल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे.
नीरव मोदीच्या जगभरात विविध देशांमध्ये कंपन्या होत्या. त्यांचे दिवाळे निघाल्याचे दाखविण्य़ात आले आहे. या कंपन्यांच्या दिवाळखोरीचा तपास करताना ही बाब समोर आली आहे. नीरवने आपल्याच कंपन्यांना हा हिरा विकला. यावेळी या हिऱ्याच्या किंमतीमध्ये लाखो डॉलरचा उतार-चढाव दाखविण्यात आला. 2011 मध्ये नीरव मोदीने हा हिरा तीन कंपन्यांमध्येच कमीतकमी चारवेळा खरेदी-विक्री केली.
नीरव मोदीने केलेल्या पीएनबी बँक घोटाळ्यामध्ये राऊंड ट्रिपिंगचा वापर करण्यात आला आहे. हा आयात-निर्यातीचा असा खेळ आहे, की जो एकाच वस्तूच्या वारंवार खरेदी-विक्रीला वेगवेगळ्या व्यवहाराच्या रुपामध्ये दाखविण्यात येते.
मोदी याची अप्रत्यक्ष मालकी असलेल्या तीन अमेरिकी ज्वेलरी कंपन्यांच्या दिवाळखोरीचा तपास करणारे अधिकारी जॉन जे कारनी यांनी सांगितले की, ताबडतोब खरेदी करणे हा मोदीच्या प्लॅनचाच हिस्सा होता. याद्वारेच मोदीने एका वर्षात 4 अब्ज डॉलरचे कर्ज उचलले. तसेच भारतात 20 कंपन्यांचा समुह बनवून हिरे आणि अन्य ज्वेलरी आयात केल्याचे दाखविण्यात आले.
ऑगस्ट 2011 मध्ये पिवळ्या-नारिंगी रंगातील या हिऱ्याची पिहल्यांदा अमेरिकेतील कंपनी फायरस्टारला विक्री करण्यात आली. त्यानंतर एकाच आठवड्यात हाँगकाँगच्या फॅन्सी क्रिएशनला त्याची विक्री करण्यात आली. यावेळी या हिऱ्याची किंमत 11 लाख डॉलर दाखविण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यांतच सोलार एक्सपोर्ट कंपनीला हा हिरा पाठवण्यात आला. यावेळी हिऱ्याची किंमत 1.83 लाख डॉलर दाखविण्यात आली. ही कंपनीही निरव मोदीच्या ट्रस्टशी संबंधीत कंपनी आहे व फायरस्टारच्या मालकीची आहे.
या व्यवहारानंतर फायरस्टारने लगेचच हा हिरा पुन्हा फॅन्सी क्रिएशनला 11.6 लाख कोटींना विकला. पुन्हा दोन आठवड्यांत हा हिरा न्यूयॉर्कच्या ए. जेफ. डायमंड कंपनीने वर्ल्ड डायमंड डिस्ट्रीब्यूशनला विकला. यावेळी हिऱ्याचे बिल 12 लाख डॉलर दाखविण्यात आले. वर्ल्ड डायमंड ही युएईमधील नीरव मोदीचीच कंपनी आहे. असेच व्यवहार पुढेही चालू ठेवण्यात आले.
कुरिअर कंपनीही बदलली
अमेरिकेमध्ये ज्या कंपनीशी कुरिअर करण्याचा करार होता, त्या शिवाय फेडएक्स कुरियरद्वारेही हा हिरा परदेशात पाठिवण्यात येत होता. यामध्ये 17 लाख डॉलरचा 17 कॅरेटचा हिराही होता. फेडएक्सने हिऱ्याच्या कुरिअरसाठी केवळ 1.5 लाख डॉलरचाच इन्शुरन्स केला.