नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त; बहिणीचा माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज
By देवेश फडके | Published: January 6, 2021 10:29 AM2021-01-06T10:29:15+5:302021-01-06T10:31:46+5:30
नीरव मोदीविरोधात ईडीने दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने दोघांचा अर्ज मंजूर केला आहे.
मुंबई : पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि फरारी घोषित करण्यात आलेल्या नीरव मोदी याच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये आता बहीण आणि तिचे पती माफीचा साक्षीदार होण्यास तयार झाले आहेत. या दोघांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला असून, तो मंजुरही करण्यात आला आहे.
मुंबईत स्थापन करण्यात आलेल्या विशेष पीएमएलए न्यायालयात ईडीकडून नीरव मोदीविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. नीरव मोदीची बहीण पूर्वी मेहता आणि तिचे पती मयंक मेहता यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठीचा अर्ज दाखल केला होता. नीरव मोदीमुळे जीवन उद्ध्वस्त झाले असून, आता नीरवपासून दूर राहायचे आहे. यासह नीरव मोदी प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे सादर करू शकतो, असे या दोघांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले.
पूर्वी मेहता यांच्याकडे बेल्जियमचे नागरिकत्व असून, त्यांचे पती मयंक मेहता हे ब्रिटीश नागरिक आहेत. जागतिक पातळीवरील कोरोना संकटामुळे भारतात येऊ शकत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदवू शकतो, असे मयंक मेहता यांच्याकडून सांगण्यात आले होते. नीरव मोदीच्या कथित गुन्हेगारी कृत्यांमुळे आमच्या दोघांचेही खासगी आणि व्यवसायिक जीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. अनेक आघाड्यांवर मोठा फटका बसला आहे. ईडीला सहकार्य करत माफीचे साक्षीदार होऊन महत्त्वाचे खुलासे करू शकतो. यामुळे अन्य आरोपींवरील आरोप सिद्ध होण्यास मदत होऊ शकते, असेही पूर्वी आणि मयंक मेहता यांच्याकडून सांगण्यात आले.