नीरव मोदी लंडनमध्ये करतोय ऐष; हॉटेलच्या खोलीचं एका दिवसाचं भाडं ७५,००० रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 03:46 PM2018-02-17T15:46:35+5:302018-02-17T16:38:22+5:30
या सूटच्या बाल्कनीतून लंडनच्या सेंट्रल पार्कचा परिसर दिसतो.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या घोटाळ्याचा सूत्रधार नीरव मोदी या सगळ्यापासून दूर लंडनमध्ये ऐषोआरामात जगत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी सध्या न्यूयॉर्कच्या सर्वात महागड्या हॉटेल्सपैकी एक असणाऱ्या जे डब्ल्यू मॅरिएट एसेक्स हाऊस हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. नीरवची पत्नी अमी, त्याचा भाऊ निशाल आणि मामा मेहुल चोकसी हे सगळे याठिकाणी एकत्र राहत आहेत. जे डब्ल्यू मॅरिएट एसेक्स हाऊस हॉटेलमधील 36 व्या मजल्यावर त्यांचा लक्झरी सूट आहे. या सूटच्या बाल्कनीतून सेंट्रल पार्कचा परिसर दिसतो. या सूटचे एका दिवसाचे भाडे तब्बल 75 हजार रुपये इतके आहे. नीरव मोदीने 67.50 लाख रुपये मोजून तब्बल तीन महिन्यांसाठी हा सूट बुक केल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी याला पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड होणार याची कुणकुण अगोदरच लागली होती. त्यामुळे नीरव मोदीने अगोदरच या हॉटेलचे बुकिंग केले होते. नीरव मोदी १ जानेवारी रोजी तर बेल्जियमचा नागरिक असलेला त्याचा भाऊ निशाल हाही त्याच दिवशी देशातून पळाला. अमेरिकी नागरिक असलेली नीरवची पत्नी ६ जानेवारी रोजी, तर मेहुल चोकसी ४ जानेवारीला भारतातून पळाले.
पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीला आल्यानंतर सीबीआय आणि ईडीने नीरव मोदी याच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकून तब्बल 5 हजार 100 कोटींची मालमत्ता जप्त केली होती. दुसरीकडे नीरव मोदी व मेहुल चोकसी यांनी भारतात परत यावे आणि तपास यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी दोघांचे पासपोर्ट शुक्रवारी निलंबित करण्यात आले. मोदी व चोकसीच्या शोधासाठी सीबीआयने इंटरपोलशी संपर्क साधला आहे. त्यांच्याविरोधात ‘डिफ्यूजन नोटीस’ जारी करण्याची विनंती इंटरपोलला केली आहे.