नीरव मोदीने रद्द झालेल्या पासपोर्टवर चारवेळा केली परदेशवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:49 PM2018-06-14T12:49:34+5:302018-06-14T12:49:34+5:30
परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता.
मुंबई: पंजाब नॅशनल बँकेकडून 12 हजार कोटींचे कर्ज घेऊन फरार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदी रद्द झालेल्या पासपोर्टवर बिनदिक्कतपणे परदेशवाऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. इंटरपोलने यासंदर्भात भारतीय तपासयंत्रणांना माहिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 24 फेब्रुवारी रोजी नीरव मोदीचा पासपोर्ट रद्द केला होता. मात्र, त्यानंतरही नीरवने चारवेळा हा पासपोर्ट वापरला. मार्च महिन्यात त्याने या पासपोर्टचा शेवटचा उपयोग केला होता. इंटरपोलने 5 जून रोजी यासंदर्भात पत्र पाठवून भारतीय तपासयंत्रणांना माहिती दिली आहे. त्यानुसार नीरवने 15 मार्च ते 31 मार्च या काळात अमेरिका, ब्रिटन आणि हाँगकाँग या देशांमध्ये प्रवास केला.
काही दिवसांपूर्वी नीरव मोदीने लंडनमध्ये राजाश्रयाची मागणीही केली होती. त्यानंतर आता नीरव ब्रसेल्सला पळून गेला आहे. मात्र, यासाठी त्याने भारताच्या नव्हे तर सिंगापूरच्या पासपोर्टचा वापर केला. तो सिंगापूरच्या पासपोर्टवर प्रवास करत असेल, तर या प्रकरणात भारत सरकार कोणतीच कार्यवाही करू शकत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.