Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींच्या सुरक्षेवर दररोज 50 हजारांचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 08:57 AM2020-01-23T08:57:48+5:302020-01-23T09:02:51+5:30
Nirbhaya Case : तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
नवी दिल्लीः तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज जवळपास 50 हजार रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावत फासावर लटवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर एवढा खर्च करण्यात येत आहे. तुरुंगाच्या बाहेर 32 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले असून, फाशी देण्यासह इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जात आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आराम मिळावा आणि चोख सुरक्षा व्यवस्था राबवावी, यासाठी जेल प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
चारही दोषींना तिहार तुरुंगातील जेल नंबर 3मध्ये वेगवेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रत्येक दोषीच्या बाहेर दोन सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रत्येक दोन तासांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना थोडी विश्रांती दिली जाते. शिफ्ट बदलल्यानंतर दुसरे सुरक्षा कर्मचारी त्यांच्याजागी पाठवले जातात. प्रत्येक कैद्यासाठी 24 तास आठ-आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामाला लावण्यात आलं आहे. चार कैद्यांसाठी जवळपास 32 सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. ते 24 तासांत 48 तास शिफ्टमध्ये काम करत आहेत. या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याच्या आधी त्यांना इतर कैद्यांबरोबर ठेवण्यात येत होते. परंतु न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ते कैदी आत्महत्या करू नये, तुरुंगातून पळून जाऊ नये, यासाठी कैद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातूनही त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे.
1 फेब्रुवारीला होणार फाशी
या दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असून, 30 जानेवारीला जल्लादला बोलावण्यात आलं आहे. जेणेकरून जल्लाद फाशी देण्याचं प्रात्यक्षिक करू शकेल. बुधवारी पवन आणि विनय या दोघांच्या कुटुंबीयांनीही तुरुंग प्रशासनाची भेट घेतली आहे.