Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:45 PM2020-03-05T14:45:07+5:302020-03-05T15:09:59+5:30
Nirbhaya Case : चार दोषींविरोधात नवे डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारही दोषींना 20 मार्चला पहाटे साडे पाच वाजता फाशी देण्यात येणार आहे. या चार दोषींविरोधात नव्याने डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.
बुधवारी दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. त्यामुळे चारही दोषींना लवकरच फासावर लटकवले जाणार हे निश्चित झाले होते. याशिवाय, मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग या चारही दोषींना नव्या डेथ वॉरंटसाठी तिहार कारागृह प्रशासनाने बुधवारी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. अखेर, या दोषींविरोधात गुरुवारी अडीज वाजता डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे.
Nirbhaya Case: Delhi Court issues a fresh death warrant against the four convicts. They are to be hanged at 5.30 am on March 20, 2020 pic.twitter.com/MAOx5rVVGw
— ANI (@ANI) March 5, 2020
या चौघांना मंगळवारी 3 मार्च रोजी फाशी द्यायची असे आधी ठरले होते; परंतु पवन गुप्ता याने ऐनवेळी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी त्या दिवशीचे डेथ वॉरंट स्थगित केले होते. पवनचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर काही तासांतच फाशीच्या नव्या तारखेसाठी म्हणजेच डेथ वॉरंटसाठी अर्ज केला गेला.
पवनचा दयेचा अर्ज हा शेवटचा होता. आता चारही खुन्यांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज कुठेही प्रलंबित नाहीत. तेव्हा नव्या तारखेचे डेथ वॉरंट लगेच जारी करावे, असा आग्रह प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी धरला होता.मात्र, दोषींना नोटीस न देता असे वॉरंट काढणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने चारही खुन्यांना औपचारिक नोटीस काढून गुरुवारी सुनावणी ठेवली होती.