टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएच्या चार्जशीटमध्ये 12 जणांसह हाफिज सईद व सय्यद सलाहुद्दीनचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 02:13 PM2018-01-18T14:13:11+5:302018-01-18T14:13:38+5:30
काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे.
नवी दिल्ली- काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे. त्यात पाकिस्तानमधला जमाद-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन यांचाही समावेश आहे. सहा महिन्यांच्या सखोल चौकशीनंतर एनआयएच्या हाती भक्कम पुरावे सापडले आहेत. त्याआधारेच एनआयएनं या दोन दहशतवाद्यांचं नाव चार्जशीटमध्ये समाविष्ट केलं आहे. दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत एनआयएनंही ही चार्जशीट दाखल केली असून, एनआयएला आरोप सिद्ध करता न आल्यास आरोपी जामीन मिळवण्यासही पात्र असतील. गेल्या काही दिवसांपूर्वी टेरर फंडिंगप्रकरणी कारवाई करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणे (एनआयए)नं हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक केली होती. सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा शाहिद युसूफ जम्मू-काश्मीरचा सरकारी कर्मचारी आहे. शाहिद युसूफ जम्मू-काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ज्युनिअर इंजिनीअर आहे. 2011 टेरर फंडिंगप्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शाहिद युसूफ सौदी-अरेबियामधील हिजबुल मुजाहिद्दीनचा ऑपरेटिव्ह एजाज अहमद भटच्या संपर्कात होता हे तपासात निष्पन्न झालं होतं. एजाज अहमददेखील एनआयएच्या रडारवर आहे. शाहिद युसूफला काश्मीर खो-यात अलगावादी आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी पैसे पुरवण्यात आले होते.
टेरर फंडिंग प्रकरणात गिलानीच्या दुस-या मुलाला NIAनं बजावलं समन्स
हुर्रियत कॉन्फरन्सचे फुटीरतावादी नेते गिलानी यांच्या मुलालाही टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं समन्स बजावण्यात आलं होतं. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या जवळचे देवेंद्र सिंह बहल यांच्या घर आणि कार्यालयावर एनआयएनं छापेमारी केली होती. टेरर फंडिंगचे धागेदोरे हे पाकिस्तान उच्चायुक्तापर्यंत पसरल्याचंही समोर आलं होतं.
फुटीरतावादी नेता गिलानींच्या जावयासहित 7 जण अटकेत
काश्मीर खो-यामध्ये हिंसक कारवाया घडवण्यासाठी तसंच दहशतवाद वाढवण्यासाठी कथित स्वरूपात पाकिस्तानकडून आर्थिक रसद घेतल्याच्या आरोपावरून 24 जुलै रोजी सात काश्मिरी फुटिरतावादी नेत्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (NIA) अटक केली होती. जम्मू-काश्मीर पोलिसांतील सूत्र तसेच दिल्लीतील एनआयएमधील एका अधिक-यानं दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये नईम खान, फारूक अहमद डार ऊर्फ बिट्टा कराटे, अल्ताफ अहमद शाह, शाहिद-उल-इस्लाम, अयाज अकबर, पीर सैफुल्ला व राजा मेहराजुद्दीन कलवल यांचा समावेश होता.