निर्भया : आरोपींचे वकील म्हणाले, तिहारचे अधिकारी दस्तावेज देत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 05:43 AM2020-01-25T05:43:31+5:302020-01-25T05:43:52+5:30
निर्भया बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी दोन दोषींच्या वकिलाने तिहार कारागृहाचे अधिकारी काही दस्तावेज उपलब्ध करून देण्यात विलंब करीत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली.
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी दोन दोषींच्या वकिलाने तिहार कारागृहाचे अधिकारी काही दस्तावेज उपलब्ध करून देण्यात विलंब करीत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली. दोषी अक्षय कुमार सिंह (३१) आणि पवन गुप्ता (२५) यांच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कारागृह अधिकाऱ्यांनी अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही, असे वकील ए.पी. सिंह यांनी म्हटले.
विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट जारी केले
होते. या सगळ्यांना २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार होती; परंतु त्यांच्या याचिका प्रलंबित राहिल्यामुळे शिक्षा अमलात आली नाही.
या खटल्यात सहा आरोपी होते. त्यातील एक जण अल्पवयीन होता. सुधारगृहात शिक्षा भोगून झाल्यावर त्याची सुटका झाली. राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.
याचिकेवर आज होणार सुनावणी
फाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोषी हे नाही, तर दुसरे कारण शोधत असल्याचे यातून दिसते. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे. विनय कुमार शर्मा (२६) आणि मुकेश सिंह (३२) यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळल्या आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अत्यंत घृणास्पद गुन्ह्यातील दोषी न्यायालयीन प्रक्रियेचा लाभ घेत आहेत, असे म्हटले. ब्लॅक वॉरंट जारी झाल्यावर दोषींना सात दिवसांत फाशीची शिक्षा दिली जाण्याची मर्यादा असावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे.